मुख्यमंत्री पदावरून राष्ट्रवादीने उडवली भाजप-सेनेची खिल्ली

टीम महाराष्ट्र देशा : राज्यातील विधानसभा निवडणुका आता जवळ आल्या आहेत. अशातच मुख्यमंत्रीपदावरून भाजप-सेनेमध्ये चढाओढ पाहायला मिळत आहे. यावरून राष्ट्रवादी कॉंग्रेसने ट्वीट करून भाजप-सेनेची खिल्ली उडवली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसने एक काल्पनिक फोटो ट्विट केला आहे ज्याला मुख्यमंत्रीपदाची ‘हॉट सीट’.. अस हेडिंग देण्यात आल आहे. या फोटोत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस खुर्चीवर पाय ठेवून घाबरलेल्या अवस्थेत बसलेले दाखवले आहेत. तसेच दुसरीकडे आदित्य ठाकरे शिवसेना नेते संजय राऊत यांच्या मदतीने फटाक्यांच्या माळेची वात पेटवत असल्याचं दाखवण्यात आलं आहे. ही फटाक्यांची माळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बसले असलेल्या खुर्चीच्या खाली जाऊन संपताना दाखवण्यात आली आहे. यावरून शिवसेना देवेंद्र फडणवीस यांच्या पदाला सुरुंग लावत आहे अस स्पष्ट होत आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून भाजप आणि शिवसेनेचे नेते मुख्यमंत्री पदावर दावा करत आहेत. शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी काही दिवसांपूर्वी काहीही झाल तरी मुख्यमंत्री आमचाच होणार अस विधान केले होते. तर मुख्यमंत्री फडणवीस यांनी मी भाजपसह शिवसेनेचाही मुख्यमंत्री आहे अस विधान करत मुख्यमंत्रीपदावर दावा केला आहे.