देवेंद्रा अजब तुझे सरकार ; प्रचार दौऱ्यात महाराष्ट्र पिंजून काढतां अन् दुष्काळाची माहिती फोनवरून घेता

blank

टीम महाराष्ट्र देशा : राज्यात दुष्काळाची परिस्थिती असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस फोनवरून दुष्काळाची माहिती घेत आहेत. यामुद्यावरून राष्ट्रवादी कॉंग्रेसने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. ‘प्रचार दौऱ्यात महाराष्ट्र पिंजून काढतां अन् दुष्काळाची माहिती फोनवरून घेता’ असा टोला त्यांनी लगावला आहे. परभणी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या फेसबुक पेजवरून ही टीका करण्यात आली आहे.

सध्या राज्यात दुष्काळाची परिस्थिती आहे. त्यामुळे सर्व पक्षांनी दुष्काळी दौरे सुरु केले आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारही दुष्काळ दौऱ्यावर आहेत. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दुष्काळ दौऱ्याची पाहणी फोनवरून माहिती घेत करत आहेत. याच मुद्यावरून राष्ट्रवादी कॉंग्रेसने देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला.

प्रचार दौरे करताना संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढता, घसा बसे पर्यंत आरडाओरड करता. आणि दुष्काळ पाहणी म्हटलं की किती ऊन आहे हा विचार करता. एसी मध्ये बसून ४–५ वाट्या सूप घेता, आणि खुर्चीवर रेलून फोन वर बोलून असं दाखवता की शेतकऱ्यांचा किती कळवळा आहे. अशा आशयाची फेसबुक पोस्ट राष्ट्रवादी कॉंग्रेसने केली आहे.

इतकेच नव्हे तर, एकीकडे ७९ वर्षांचा माणुस, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार ४०-४५ डिग्री उन्हामध्ये जाऊन प्रत्यक्ष दुष्काळाची पाहणी करतोय, शेतकऱ्यांच्या काय व्यथा आहेत ते जाणून घेतोय. असेही त्या पोस्ट मध्ये म्हंटले आहे.