शिवसेनेच्या मदतीला राष्ट्रवादीचे नगरसेवक

औरंगाबाद : औरंगाबाद महानगरपालिकेत शिवसेनेचा महापौर असला तरी महापौर पदावर बसण्यासाठी आमदार सतीश चव्हाण यांनी राष्ट्रवादीचे पाच नगरसेवक दिल्याचे शिवसेनेचे माजी महापौर नंदकुमार घोडेले यांनी सांगितले. मला महापौर होण्यासाठी पाच नगरसेवकांच्या पाठिंब्याची गरज होती. अशा वेळी सतीश चव्हाण यांनी मला पाच नगरसेवकांची मते दिले. त्यामुळेच मी महापौर झालो, असा गौप्यस्फोट घोडेले यांनी केला आहे. आमदार सतीश चव्हाण यांच्या सत्कार समारंभाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.

आमदार सतीश चव्हाण यांचा विजय महाविकास आघाडी चा विजय असून शिवसेना पक्षाच्या नेत्यांनी प्रामाणिकपणे त्यांचा प्रचार केला असल्याचं घोडेले यांनी सांगितलं. औरंगाबाद महानगरपालिकेमध्ये शिवसेना-भाजपची सत्ता असतानाच सतीश चव्हाण यांनी आपल्याला महापौर होण्यासाठी मदत केली, असेही ते म्हणाले.

शहरातील अनेक समस्या सोडवण्यासाठी आमदार सतीश चव्हाण कायम पुढाकार घेत असून त्यांच्या प्रयत्नातून अनेक कामे मार्गी लागली असल्याचं घोडेले यांनी नमूद केले.

चार होते पाचवा कोण?
औरंगाबाद महानगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे चार नगरसेवक होते. असे असताना महापौर घोडेले पाच नगरसेवक मी दिल्याचे सांगत आहे. हा पाचवा नगरसेवक कोणता? हा प्रश्न मलाच पडला असल्याचे सतीश चव्हाण यांनी सत्काराला उत्तर देतांना म्हटले.

महत्वाच्या बातम्या