उद्या हाफ चड्डी, टोपी घालून फिरू नका, संस्था वाचवण्यासाठी मोहिते पाटलांचे भाजपमध्ये ‘स्थिरीकरण’

टीम महाराष्ट्र देशा: सोलापूर जिल्ह्यातील बडे प्रस्थ रणजितसिंह मोहिते पाटील यांनी कृष्णा- भीमा स्थिरीकरणासाठी भाजपमध्ये प्रवेश केल्याचं सांगितले आहे, मात्र मोहिते पाटील यांनी अडचणीत आलेल्या आपल्या सहकारी व खाजगी संस्थांचे स्थिरीकरण करण्यासाठी भाजपमध्ये प्रवेश केला. अशी टीका राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे. माढा लोकसभा मतदारसंघात आयोजित सभेत ते बोलत होते.

मोहिते पाटील यांनी सत्तेसाठी भाजपमध्ये प्रवेश केला असला, तरी उद्या लाचार होत हाफ चड्डी, टोपी घालून फिरू नये, असा टोला पवार यांनी लगावला आहे. छगन भुजबळ यांना उपमुख्यमंत्री पद सोडावं लागल्यानंतर ९० टक्के आमदारांनी अजितदादांना पाठींबा दिला होता, मात्र मी विजयसिंह मोहिते पाटील यांना पसंती देत उपमुख्यमंत्री केले, असा गौप्यस्फोट पवार यांनी यावेळी केला.

आज मोहिते पाटलांवर अन्याय झाल्याची टीका केली जाते, पंरतु त्यांना काय काय दिले याचा विचार करताना मोठी यादी पुढे येते, असा टोला त्यांनी लगावला आहे. मोहिते पाटील यांना बांधकाम, ग्रामविकास, पाठबंधारेमंत्री केले. साखर संघाचे अध्यक्षपद तसेच साखरे संदर्भातल्या  अभ्यास गटात त्यांचा समावेश केल्याचा पाढा, यावेळी शरद पवार यांनी  वाचला.