fbpx

आघाडीत बिघाडीची शक्यता, पहिल्याच बैठकीत राष्ट्रवादीची अर्ध्या जागांची मागणी

टीम महाराष्ट्र देशा : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी काँग्रेस आणि राष्ट्रवादीची बैठक पार पडली. या बैठकीत जागा वाटपाविषयी चर्चा झाली. यात राष्ट्रवादी कॉंग्रेसने विधानसभेसाठी अर्ध्या जागांची मागणी केली आहे. त्यामुळे आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता आहे.

या बैठकीमध्ये २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीची कामगिरी चांगली असल्यामुळे विधानसभा निवडणुकीत ५०-५० टक्के जागा वाटप व्हावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने केली. परंतु दुसरीकडे काँग्रेसने मात्र २०१४ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानुसार जागा वाटपाचे सूत्र असावे असा प्रस्ताव मांडला आहे. म्हणजे २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत जिंकलेल्या जागांसह ज्या जागांवर दोन क्रमांकावर ज्या पक्षाचा उमेदवार असेल त्या जागा त्या पक्षाला मिळाव्या अशी भूमिका काँग्रेसने मांडली आहे.

दरम्यान, २०१४ साली काँग्रेसने जिंकलेल्या ४२ जागा आणि दुसऱ्या क्रमांकावरचे काँग्रेसचे ६४ उमेदवार, अशा १०६ जागा थेट मिळाव्यात. तर राष्ट्रवादीने जिंकलेल्या ४१ जागा आणि दुसऱ्या क्रमांकाच्या ५४ अशा एकूण ९५ जागा राष्ट्रवादीने घ्याव्यात, अशी मागणी काँग्रेसने केली. त्यामुळे येत्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस काय भूमिका घेणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.