पुणे महापौर आयुक्तांचा बंगला कचरा डेपोशेजारी उभारा

pune mahapalika125

पुणे: महापौर, महापालिकेचे आयुक्त तसेच इतर सर्व खाते प्रमुखांची घरे हडपसर येथील रोकेम कचरा प्रकल्पाच्या बाजूच्या आरक्षित जागेत उभारावीत असा प्रस्ताव राष्ट्रवादी नगरसेवकांनी शहर सुधारणा समितीला दिला आहे. सध्या रामटेकडी येथील कचरा प्रकल्पाला मोठा विरोध होत आहे. त्यातच नवीन कचरा प्रकल्प उभारण्याच्या हालचाली पालिकेकडून केल्या जात आहेत. मात्र प्रमुख पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांची घरे कचरा प्रक्रिया प्रकल्पाच्या शेजारी बांधल्यास सध्या राहणाऱ्या नागरिकांच्या समस्या आयुक्तांना आणि महापौरांना समजतील आणि कचरा प्रकल्पा बाबत संयुक्तिक निर्णय घेण सोपे जाईल म्हणत अशा स्वरूपाचा प्रस्ताव राष्ट्रवादी नगरसेवक योगेश ससाणे, भैय्यासाहेब जाधव यांनी शहर सुधारणा समितीला दिला आहे.

रामटेकडी येथे महापालिकेच्या वतीने ७०० टनाचा मिश्र कचरा प्रक्रिया प्रकल्प सुरू केला जात आहे. मात्र या प्रकल्पाला हडपसरमधील स्थानिक नगरसेवकांनी नागरिकांच्या माध्यमातून या प्रकल्पाला विरोध सुरू केला आहे. तर दुसरीकडे  प्रशासन आणि सत्ताधारी तिथेच प्रकल्प उभारण्यावर ठाम आहेत. त्यामुळे स्थानिक राष्टवादीचे नगरसेवक योगेश ससाणे यांनी हडपसर कचरा डेपो शेजारील प्लॉट नंबर १०४ या आरक्षित जागेवर महापौर , आयुक्त आणि सर्व खातेप्रमुखांची सदनिका बांधाव्यात तसेच यासर्वांच्या मुलांची शैक्षणिक व्यवस्था कचरा डेपो समोरील न्यू इंग्लिश स्कुल या ठिकाणी करावी म्हणजे कचरा प्रकल्पाशेजारी राहणाऱ्या नागरिकांच्या समस्यांचे आकलन होईल आणि कचरा प्रकल्प सुरु करण्याबाबत निर्णय घेणे सयुक्तिक होईल असा प्रस्ताव राष्ट्रवादी नगरसेवक योगेश ससाणे, भैय्यासाहेब जाधव यांनी शहर सुधारणा समितीला दिला आहे.