भाजप सरकारचा ४० हजार कोटींचा सिंचन घोटाळा; राष्ट्रवादीचा सनसनाटी आरोप

मुंबई: राज्यात भाजप सरकार आल्यापासून 307 सिंचन प्रकल्पांना तब्बल 40 हजार कोटींची सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली. आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन विरोधकांनी ५० वर्षात ४६ हजार कोटी रुपये खर्च झाले असताना ७० हजार कोटी रुपयांचा भ्रष्ट्राचार झाल्याचा आरोप केला होता. मग आता देण्यात आलेली मान्यता भ्रष्ट्राचार नाही का असा प्रश्न उपस्थित करत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी भाजपवर सनसनाटी आरोप केला आहे. राष्ट्रवादीकडून आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. दरम्यान मुख्यमंत्र्यांनी याबाबतचा खुलासा करण्याची मागणी देखील त्यांनी केली आहे.

गेल्या तीन वर्षात मुख्यमंत्र्यांनी १८ भ्रष्ट्राचारी मंत्र्यांना क्लीन चीट दिली. समृद्धी महामार्गाची जबाबादारी असलेले सनदी अधिकारी राधेश्याम मोपलवार यांची एक क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली. मुख्यमंत्र्यांनी सांगितले त्यांची चौकशी करू. जॉनी जोसेफ यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली. या समितीने सरकारच्या प्रथेप्रमाणे त्यांना क्लीनचिट दिली व त्यांना त्याच पदावर नियुक्त करण्यात आले. हा महामार्ग म्हणजे सर्वात मोठा घोटाळा असल्याचा आरोपही मलिक यांनी केला आहे.