दिल्लीतील ४४९ खासगी शाळा ताब्यात घेण्याच्या आदेशाला नायब राज्यपालांची मंजुरी

नवी दिल्ली : दिल्लीतील ४४९ खासगी शाळा ताब्यात घेण्यासंदर्भातील दिल्ली सरकारच्या आदेशाला नायब राज्यपाल अनिल बैजल यांनी मंजुरी दिली आहे. या खासगी शाळा शुल्काच्या नावाखाली पालकांची मोठ्या प्रमाणावर आर्थिक लूट करत असल्याच्या तक्रारी करण्यात आल्या होत्या . या प्रकरणी सरकारने दिलेल्या आदेशाकडेही ४४९ शाळांनी दुर्लक्ष केले होते. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. दिल्ली सरकारने काही दिवसांपूर्वी ४४९ खासगी शाळा सरकारच्या ताब्यात करण्यासंदर्भातील प्रस्ताव मांडला होता. या शाळांच्या यादीमध्ये मथुरा रोड, स्प्रिंग डेल, अमिटी इंटरनेशनल साकेत, संस्कृति स्कूल, मॉडर्न पब्लिक स्कूल यांसारख्या शाळांचाही समावेश आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने स्थापन केलेल्या समितीच्या शिफारसींचे ४४९ खासगी शाळांकडून पालन करण्यात येत नाही. तसेच या शाळा दिलेल्या आदेशाचे वारंवार उल्लंघन करत आहेत.त्यामुळे या शाळांचे अधिकार सरकारच्या ताब्यात घेत असल्याचे सरकारने दिल्ली उच्च न्यायालयात सांगितले होते.