नक्षलवाद्यांनी हत्या केलेल्या मंडवींच्या कुटुंबीयांनी केले मतदान,देशा समोर ठेवला नवा आदर्श

टीम महाराष्ट्र देशा- छत्तीसगडमधील नक्षल प्रभावित दांतेवाडा भागात नक्षलवाद्यांनी भाजपा आमदार भीमा मंडवी यांच्या ताफ्याला लक्ष्य करून हल्ला घडवून आणला. नक्षलवाद्यांनी ताफ्याला लक्ष्य करून आयईडीद्वारे घडवलेल्या स्फोटात भाजपा आमदार भीमा मंडवी यांचा मृत्यू झाला होता. मात्र शोकसागरात बुडालेल्या आमदार भीमा मंडवींच्या कुटुंबीयांनी स्वतःला सावरत नक्षलवाद्यांच्या पुढे गुडघे न टेकवता मतदानाचा हक्क बजावत देशासमोर एक नवा आदर्श निर्माण केला आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान गुरुवारी पूर्ण झाले. दरम्यान, पहिल्या टप्प्यासाठीचा प्रचार संपण्यापूर्वी काही वेळ आधी नक्षलवाद्यांनी छत्तीसगडमधील दांतेवाडा परिरसात बॉम्बस्फोट घडवून भाजपा आमदार भीमा मंडवी यांची हत्या केली होती.

भीमा मंडवी यांची हत्या झाल्यानंतर मतदानावर बहिष्कार घालण्याची धमकी नक्षलवाद्यांनी ग्रामस्थांना दिली होती. दरम्यान,भीमा मंडवी यांच्यावर बुधवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. नक्षलवादाच्या सावटातून जनतेला बाहेर काढून लोकशाही बळकट करण्याचा भीमा मंडवी यांनी नेहमीच प्रयत्न केला होता.


मंडवी यांचे अपूर्ण राहिलेले स्वप्न पूर्ण करण्याचा निर्णय कुटुंबीयांनी घेतला. नक्षलवादी विविध मार्गांनी दडपशाही करत असताना या कुटुंबाने लोकशाहीवरील आपला विश्वास कायम ठेवला. गुरुवारी आमदार मंडवी यांचे अस्थिविसर्जन करण्यात आले.त्यानंतर भीमा मंडवी यांच्या कुटुंबीयांनी गावातील मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला.

Loading...

शोकसागरात असणारे हे कुटुंब मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर दाखल होताच घाबरलेल्या नागरिकांमध्ये विश्वास निर्माण झाला. भीमा मंडवींचे वडील, पत्नी आणि अन्य कुटुंबीयांनीही मतदान केल्यानंतर या मतदान केंद्रावर मंडवी यांचे कुटुंबीयच नव्हे तर अन्य ग्रामस्थांनीही नक्षलवाद्यांच्या धमकीला झुगारून देत मतदानाचा हक्क बजावला.

Loading...

Loading...