बॅनर जाळुन गावक-यांनी केला नक्षल सप्ताहाचा निषेध

मरकेगाव- मरकेगाव भागात सावरगाव गॅरापत्ती रोडवर नक्षलवाद्यांकडुन 28 जुलै नक्षल सप्ताह पाळण्याचे आवाहन करण्याचे बॅनर लावण्यात आले होते. अतिदुर्गम आदिवासी भागातील गावक-यांनी एकजुटीने निर्धार करुन नक्षलवाद्यांच्या 28 जुलै शहिद सप्ताहाला विरोध करत नक्षलवाद्यांनी लावलेले लोकशाही विरोधी, सप्ताह पाळण्याचे व नक्षल समर्थनाचे बॅनर स्वत: काढुन रस्त्यावर टाकुन जाळले.
आतापर्यन्त नक्षलवाद्यांच्या बंदने काय साध्य झाले? आम्ही नक्षलवाद्यांचा बंद पाळुन आमचा विकास का थांबवायचा असा परखड सवाल करत गावक-यांनी एकत्र येवुन नक्षलवाद्यांविरोधात आवाज उठवला आहे. जे नक्षलवादी आपल्या आदीवासी बांधवांची हत्या करतात जे आपल्या भागाच्या विकासाला विरोध करता अशा नक्षलवाद्यांच्या बंदला आता आम्ही प्रतिसाद देणार नाही. असे आदीवासी दुर्गम भागातील गावकऱ्यांनी एकजुटीने नक्षल सप्ताह न पाळण्याचा निर्धार करीत नक्षलवाद्यांनी लावलेल बॅनर काढुन त्याची होळी केली. ज्या मरकेगाव भागात 2009 मध्ये नक्षलवाद्यांनी हिंसा घडवुन 15 पोलीस जवानांना मारले त्याच भागात आता सामान्य आदीवासी कडुन नक्षलवाद्यांना विरोध होत आहे.आमच्या सारखे इतर गावक-यांनीही नक्षलवाद्यांच्या हिंसक कृत्यांचे समर्थन न करता एकजुटीने नक्षल्यांविरोधात आवाज उठवुन बंद न पाळण्याचे आवाहन गावक-यांनी केले आहे.