नवाब मलिकांच्या टीकांना आळा घालावा; न्यायालयात जनहित याचिका दाखल

नवाब मलिकांच्या टीकांना आळा घालावा; न्यायालयात जनहित याचिका दाखल

मुंबई : एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद शिगेला पोहचला आहे. नवाब मलिकांनी समीर वानखेडेंविरोधात अनेक आरोप करत त्यांच्याशी संबंधित अनेक कागदपत्रे सोशल मीडियावर शेअर केली आहेत. त्यावरुन समीर यांच्या समर्थनार्थ आता त्यांचे कुटुंबीय आणि मूळ वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील वरुड तोफा गावचे गावकरी आले आहेत.

मंत्री मलिक यांच्याकडून सातत्याने समीर वानखेडे यांच्याविरुद्धच्या टीकेला आणि आरोपांविरुद्ध जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यावर, तात्काळ सुनावणी करण्यास न्यायालयाने नकार दिला आहे. उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेतून, समीर वानखेडे यांच्यावर नवाब मलिक यांच्याकडून सातत्याने होणाऱ्या टीकेला आळा घालण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र, न्यायालयाने या याचिकेवर तात्काळ सुनावणीला नकार दिला आहे.

मुख्य न्यायाधीश दिपांकर दत्ता आणि न्यायमू्र्ती एमएस. कर्णिक यांच्या खंडपीठासमोर एक व्यवसायीक आणि मौलाना असल्याचा दावा करणाऱ्या व्यक्तीने संबंधित याचिकेवर तात्काळ सुनावणी करण्याची मागणी केली होती. त्यावर, न्यायालयाने दिवाळीपर्यंत वाट पाहण्याची किंवा व्हॅकेशन खंडपीठाकडे जाण्याची सूचना याचिकाकर्त्याला केली आहे.

अधिवक्ता अशोक सरावगी यांच्या माध्यमातून दाखल याचिकेत, मंत्री नवाब मलिक यांच्याकडून तपास यंत्रणांचे मनोबल खच्ची करण्याच्या उद्देशाने केलेल्या टिपण्णींना आळा घालणे किंवा थांबवण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच, समीर वानखेडे आणि त्यांच्या कुटुंबीयांवरही व्यक्तिगत हल्ला न करण्याच्या सूचना मलिक यांना देण्याची मागणी करण्यात आली आहे.

महत्त्वाच्या बातम्या