नवाब मलिक यांच्यावर पोलीस अधिकाऱ्यांना धमकावल्याचा आरोप

मलिक यांनी फेटाळले आरोप

टीम महाराष्ट्र देशा- चौकशीसाठी बोलाविल्याच्या राग आल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी दोंडाईचा पोलीस ठाण्यातील दोन अधिकाऱ्यांना धमकावल्याची माहिती समोर आली आहे. पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी दाखल केलेल्या मानहानी प्रकरणात मलिक यांनी धमकावल्यामुळे आपण मानसिक तणावाखाली असून आपली अमरावतीला बदली करावी, अशी लेखी मागणी पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी पोलीस महासंचालकांसह अधिक्षकांकडे केली आहे. नवाब मलिक यांनी सर्व आरोप फेटाळले असून सामान्य नागरिकांनी प्रश्न विचारला तर त्याला धमकी समजली जात असेल आणि एवढ्या कमकुवत मनोबल असणारे पोलीस असतील तर महाराष्ट्रात कायद्याचं राज्य राहणे अवघड आहे असं मलिक यांनी म्हटलं आहे .

नवाब मलिक यांनी केलेले जयकुमार रावल यांच्यावर आरोप

जयकुमार रावल आणि कंपनीचा धुळे जिल्ह्यात जमीन खरेदी आणि विक्रीचा धंदा आहे. एखादा प्रकल्प जाहीर झाला की शेतकऱ्यांकडून कवडीमोलाने जमीन विकत घेतात. रावल कुटुंबीयाने राजपूत नावाच्या शेतकऱ्याकडून सुमारे चार एकर जमीन विकत घेतली.शिवाय धर्मा पाटील यांची मंत्रालयातली जमीन मिटिंग जयकुमार रावल यांनीच ऊर्जामंत्री बावनकुळे यांना सांगून रद्द केली होती. त्यामुळे निराश होऊन धर्मा पाटील यांनी आत्महत्या केली. प्रकल्प ज्या ठिकाणी येत असेल त्या ठिकाणची जमीन खरेदी करून वाढीव मोबदला सरकारकडून घेण्याचा प्रकार रावल करतात, असा आरोप नवाब मलिक यांनी केला होता. धर्मा पाटील यांच्या मंत्रालयातील आत्महत्येनंतर पर्यटनमंत्री जयकुमार रावल आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्यात चांगलाच वाद रंगला होता.

मलिक यांनी रावलांवर गंभीर आरोप केल्यानंतर रावल यांनी नवाब मलिक यांच्याविरुध्द दोंडाईचा पोलीस ठाण्यात अब्रू नुकसानीचा गुन्हा दाखल केला होता. या संदर्भात दोंडाईचा ठाण्याचे निरीक्षक हेमंत पाटील यांनी चौकशीकामी मलिक यांना पत्र पाठविले होते. हे पत्र मिळताच मलिक यांनी आम्हास भ्रमणध्वनीवरुन धमकाविले, असा दावा निरीक्षक पाटील, मोरे यांनी केला. त्यांनी या सर्व घटनाक्रमाची पोलीस ठाण्याच्या वहीत नोंद केली आहे. हेमंत पाटील यांनी महासंचालक, अधिक्षकांना लिहिलेल्या अर्जात न्यायालयाकडून परवानगी घेऊन आम्ही पुढील कार्यवाही सुरु केली. मात्र कामकाजास सुरूवात केल्यापासून मलिक धमकावत असल्याचे त्यांनी पोलिसांच्या नोंद वहीत तसेच अर्जात नमूद केले आहे.

नवाब मलिक यांनी फेटाळले आरोप

मी जर धमकी दिली असेल तर मला अटक करावी. किती अदखलपात्र गुन्ह्यांचा तपास संबधित अधिकाऱ्यांकडून केला जात आहे याची माहिती मागितली तसेच माहिती न दिल्यास न्यायालयात जाऊ असं फक्त आमचं बोलणं झालं . माझ्या या भूमिकेमुळे तो अधिकारी अडचणीत येण्याची शक्यता असल्याने त्याने हे पाउल उचलले आहे. सामान्य नागरिकांनी प्रश्न विचारला तर त्याला धमकी समजली जात असेल आणि एवढ्या कमकुवत मनोबल असणारे पोलीस असतील तर महाराष्ट्रात कायद्याचं राज्य राहणे अवघड आहे.

You might also like
Comments
Loading...