‘दाल में कुछ काला है; ज्यांचे फोन टॅप केले त्यांनी कोणतं देशविरोधी कृत्य केलं ते जाहीर करा’

nawab malik vs narendra modi

मुंबई : भारतासह जगभरातील अनेक देशांची सरकारे राष्ट्रीय सुरक्षेशी काहीही संबंध नसतानाही हेरगिरीच्या साधनांचा वापर करतात अशा चर्चा नेहमी सुरू असतात. पण ‘द वायर’ या वेबसाईटसह आणि अन्य १६ माध्यम संस्थांनी केलेल्या संयुक्त आंतरराष्ट्रीय शोधपत्रकारितेतून या बाबीला पुष्टी मिळाली आहे. हॅकिंगद्वारे भारतातील मंत्री, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते यांच्यावर पाळत ठेवण्यासाठी त्यांचे फोन हॅक करण्यात आले असण्याची शक्यता या माध्यम संस्थांच्या ‘प्रोजेक्ट पेगॅसस’मध्ये व्यक्त करण्यात आली आहे.

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी, माहिती व तंत्रज्ञानमंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासह अन्य एक मंत्री, निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर, माजी निवडणूक आयुक्त अशोक लवासा आदींनाही ‘पेगॅसस’द्वारे लक्ष्य करण्यात आल्याची शक्यता माध्यमांनी वर्तवली आहे. यावरून आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केंद्र सरकारने याबाबत स्पष्टीकरण द्यावं अशी मागणी केली आहे.

‘भाजप सरकारने पॅगेसेसच्या माध्यमातून जर फोन टॅप केले नाहीत, तर त्यांनी तसं स्पष्टीकरण द्यावं. जर खरेदी केलं असेल तर तसं देखील सांगावं. आणि ज्यांचे फोन टॅप करण्यात आले होते, त्यांनी कोणतं देशविरोधी कृत्य केलं होतं हे देखील स्पष्ट करावं. आम्हाला संशय आहे, ज्या प्रकारे सरकार विषय फिरवत आहे. यावरून स्पष्ट होतं आहे की, दाल में कुछ काला है,’ असं भाष्य मलिक यांनी केलं आहे.

पुढे त्यांनी, ‘पॅगेसेसच्या माध्यमातून पत्रकारांचे फोन हॅक झाले. यामध्ये काही सरकारी व्यवस्थेत काम करणाऱ्या व्यक्तींचे देखील फोन हॅक झाले असं समोर येत आहे. आता केंद्राकडून खुलासा होतोय की, कुठलेही फोन हॅक होत नाहीत. प्रश्न असा आहे की, पॅगेसेसकडून हा स्पायवेअर भारत सरकारनं किंवा भारत सरकारच्या एजन्सीने खरेदी केले की नाही. सर्वप्रथम सरकारने याचा खुलासा करावा. जर त्यांनी खरेदी केलं नाही तर त्यांनी तसं स्पष्टपणे सांगावं. पण सरकार याबाबत स्पष्टपणे सांगत नाही की, आम्ही हॅक केलं नाही. त्याचा अर्थ निघतो की, सरकार किंवा सरकारच्या एजन्सीने खरेदी केलेलं आहे,’ असा आरोप देखील केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

IMP