शिवसेनेचा सन्मान राखणं आणि त्यांचा स्वाभिमान जिवंत ठेवणं ही आमची जबाबदारी : राष्ट्रवादी

sharad pawar udhav thakre

टीम महाराष्ट्र देशा : राज्यात सरकार स्थापन करण्याच्या अनुषंगानं शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये काल बैठका आणि चर्चा झाल्या. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी कॉंग्रेसच्या राज्यातल्या ज्येष्ठ नेत्यांशी चर्चा केली. ही चर्चा योग्य दिशेनं सुरू असल्याचं ठाकरे यांनी वार्ताहरांना सांगितलं. तर आता मुख्यमंत्री पदाचा तिढा देखील सुटल्याची माहिती समोर येत आहे.

महाशिवआघाडीत मुख्यमंत्रिपद कोणाकडे असेल, असं राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक यांना विचारण्यात आलं, त्यावर नवाब मलिक म्हणाले, “मुख्यमंत्रिपदाच्या मुद्द्यावरच शिवसेना वेगळी झाली आहे. त्यामुळे त्यांचा सन्मान राखणं आणि त्यांचा स्वाभिमान जिवंत ठेवणं ही आमची जबाबदारी आहे. मुख्यमंत्री शिवसेनेचाच होईल.

पुढे बोलताना मलिक म्हणाले, उपमुख्यमंत्रिपदाबाबत अद्याप चर्चा झालेली नाही. काँग्रेसला सत्तेत यायचंच नाही, तर मागण्या कुठून समोर यायला लागल्या? मला नाही वाटत, त्यांना तर बाहेरुन पाठिंबा द्यायचा आहे. आमची इच्छा आहे की त्यांनी सत्तेत यावं. पद, खाती याबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही. येत्या दिवसात कोणताही वाद होणार नाही. आम्ही सगळे एकत्र बसून चर्चा करु असं मलिक म्हणाले”.

दरम्यान, काल तिन्ही पक्षांच्या प्रमुखांनी किमान समान कार्यक्रमाचा मसुदा मंजूर केल्याशिवाय सत्ता स्थापनेबाबत चर्चा होणार नाही असं कॉंग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी पी. टी. आय. शी बोलताना सांगितलं. तत्पूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेसनं कॉंग्रेसबरोबर किमान समान कार्यक्रमाबाबत चर्चा करण्यासाठी ५ सदस्यांच्या समितीची काल घोषणा केली.

दरम्यान, भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी काल राज्यातल्या सत्ता पेचावर प्रथमच एका वृत्त संस्थेकडे आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. राज्यपालांनी कुठल्याही पक्षाला सत्ता स्थापनेची संधी देण्यापासून रोखलं नसून आजही एखाद्या पक्षाकडे आवश्यक संख्याबळ असेल तर तो पक्ष राज्यपालांकडे जाऊ शकतो, असं ते म्हणाले. युतीमधल्या तणावाबाबत बोलताना ते म्हणाले की, निवडणुकीत महायुतीला यश मिळालं तर देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री असतील असं आम्ही अनेकदा जाहीर केलं होतं, त्यावेळी शिवसेनेनं विरोध का केला नाही. आता ते नवी मागणी करत आहेत, ती आम्हाला मान्य नाही.

महत्वाच्या बातम्या :