fbpx

तिवरे धरण प्रकरणातील दोषी अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा – नवाब मलिक

टीम महाराष्ट्र देशा : चिपळूणमधील तिवरे धरणाच्या दुर्घटनेतील संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून कडक कारवाई करा, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली आहे.

काल ( २ जुलै, मंगळवार ) रात्री नऊच्या सुमारास तिवरे धरण फुटलं. यामध्ये २४ जण वाहून गेले. आतापर्यंत ६ जणांचे मृतदेह हाती लागले असून इतरांचा शोध सुरू आहे. या दुर्घटनेला १२ तास उलटल्यानं मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. धरण फुटल्यानं १३ घरं वाहून गेल्यानं वित्तहानीदेखील झाली.

दरम्यान नवाब मलिक यांनी याप्रकरणातील दोषी अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, तसेच त्यांच्यावर कडक कारवाई करा अशी मागणी केली. इतकेच नव्हे तर या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांना शासनाने तात्काळ आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणीही नवाब मलिक यांनी केली.