fbpx

भ्रष्ट आणि मोठे मासे वाचवण्यासाठी खेकड्यांचा बळी घेतला जातोय : नवाब मलिक

टीम महाराष्ट्र देशा : गेल्या काही दिवसांपासून कोकणात सुरु असलेल्या जोरदार पावसामुळे रत्नागिरीतील चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण फुटल्याची घटना घडली आहे. या धरणफुटीला खेकडे जबाबदार असल्याचं जलसंधारणमंत्री तानाजी सावंत म्हटलं आहे. अशातच राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी ट्वीट करून या मंत्र्यांवर टीका केली आहे.

या ट्वीटमध्ये त्यांनी ‘जलसंधारण मंत्री तानाजी सावंत तिवरे धरण फुटल्याबद्दल खेकड्यांना जबाबदार धरतायत. त्यांच्या कंत्राटदार आमदाराला पाठीशी घालण्यासाठी हे निर्लज्ज समर्थन आहे. भ्रष्ट मोठे मासे वाचवण्यासाठी खेकड्यांचा बळी दिला जातोय. या दुर्घटनेची न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे. अशा शब्दात त्यांनी मंत्र्यांवर टीका करत न्यायालयीन चौकशीची मागणी केली आहे.

दरम्यान, जलसंधारणमंत्री तानाजी सावंतांनी खेकड्यांनी भगदाड पाडल्यामुळे तिवरे धरण फुटलं, असं ग्रामस्थ आणि अधिकाऱ्यांचं मत असल्याचा दावा केला आहे. तसेच चिपळूणचे शिवसेना आमदार सदानंद चव्हाण या घटनेला जबाबदार नसल्याचं सांगत त्यांची पाठराखण केली आहे.