fbpx

अडसूळ यांनी केवळ ५ विकास काम दाखवावी, मी माझी उमेदवारी मागे घेईन : नवनीत कौर राणा

टीम महाराष्ट्र देशा : आगामी लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चांगलीच रंगत चढत असून प्रचार सभे दरम्यान विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांंना चांगलेच धारेवर धरले जात आहे. आज अमरावती येथे युवा स्वाभिमान पक्षाकडून लोकसभेसाठी नवनीत कौर राणा यांनी उमेदवारी अर्ज भरला त्यावेळी त्यांनी सत्ताधाऱ्यांवर चांगलीच तोफ डागली असून विद्यमान खा. अनंतराव अडसूळ यांना काही सवाल विचारले आहेत.

यावेळी नवनीत कौर राणा म्हणाल्या की, गेल्या ९  वर्षांपासून मी या मतदारसंघात जीवाचं रान करत आहे. अमरावती जिल्ह्यात सर्वसामान्यांचे प्रश्न जाणून घेत आहे. या राज्यात शेतकरी सुखी झाला पाहिजे असे देखील कौर यावेळी म्हणाल्या. तसेच गेल्या १० वर्षात या खासदारांनी काय विकास केला? या खासदारांनी केवळ ५ कामं सांगावी, मी माझी उमेदवारी मागे घेईन असे आव्हान नवनीत कौर राणा यांनी खा. अडसूळ यांना दिले आहे.

दरम्यान नवनीत कौर राणा या युवा स्वाभिमान पक्षा कडून लोकसभेला शिवसेनेचे खा. अनंतराव अडसूळ यांच्या विरोधात लढणार आहेत. तर कॉंग्रेस – राष्ट्रवादी आघाडी कडून युवा स्वाभिमान पक्षाला पाठींबा देण्यात आला आहे. आज नवनीत कौर राणा यांच्या अर्ज दाखल कार्यक्रमावेळी राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे देखील उपस्थित होते. त्यावेळी मुंडे यांनी देखील अडसूळांवर चांगलेच तोंडसुख घेतले.