पंजाबमध्ये नवज्योत सिंह सिद्धू ‘या’ पक्षाचा असू शकतात मुख्यमंत्री पदाचा चेहरा

navjyot singh siddhu

अमृतसर : पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग आणि काँग्रेसचे नेते नवजोत सिंग सिद्धू यांच्यात शीतयुध्द सुरू आहे. हा कलह दिवसेंदिवस वाढतच चालला आहे.  या पार्श्वभूमीवर आता पुढील वर्षी होत असलेल्या पंजाब विधानसभा निवडणुकीपूर्वी अंतर्गत वाद मिटवण्याचं मोठं आव्हान काँग्रेस नेतृत्त्वासमोर उभे राहिले आहे.

दरम्यान, पंजाबमध्ये पुढच्या वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुक डोळ्यासमोर ठेवत सर्वच पक्षांनी मोर्चेबंधी सुरु केली असून दिग्गज नेत्यांना आपल्या गळाला लावण्यासाठी काही पक्ष प्रयत्न करत आहेत.  यातच आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या एका वक्तव्याची चांगलीच चर्चा होताना दिसत आहे.

ज्याच्यावर संपूर्ण पंजाबला अभिमान वाटतो, अशी शीख व्यक्ती यंदा ‘आप’मुख्यमंत्रिपदाचा चेहरा असेल, असे केजरीवाल यांनी म्हटले आहे. त्यामुळे ‘आप’चा चेहरा सिद्धू असतील अशी चर्चा सुरू झाली आहे. सिद्धू यांच्याविषयी विचारले असता, ते काँग्रेसचे नेते असून आपण त्यांचा आदर करतो, असे केजरीवाल म्हणाले. सिद्धू आप’मध्ये सामील होणार असतील, तर त्याची निश्चितपणे माहिती देऊ, असेही केजरीवाल म्हणाले.

दरम्यान, अमरिंदरसिंग यांच्या जाचाला कंटाळून सिद्धू निवडणुकीच्या तोंडावर ‘आप’मध्ये जातील, असे म्हटले जात आहे. सन २०१७च्या निवडणुकीपूर्वी सिद्धू यांनी अकाली दलाविरोधात भूमिका घेत भाजपचा त्याग करून काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. तेव्हाही ते ‘आप’च्या संपर्कात होते.

दरम्यान,अमरिंदर सिंग आणि नवज्योतसिंग सिद्धू यांच्या समर्थकांमध्ये आता पोस्टर वॉर सुरू झाले आहे. पंजाब कॉंग्रेसमध्ये दुफळी माजत चालली आहे. पतियाळासह अनेक शहरांमध्ये मुख्यमंत्र्यांच्या समर्थनार्थ पोस्टर्स आणि होर्डिंग्ज लावत अमरिंदर सिंग समर्थकांनी शक्ती प्रदर्शन केले होते तर सिद्धू समर्थकांनी देखील जशास तसे उत्तर दिले आहे.

महत्वाच्या बातम्या