कोरेगाव-भीमा हिंसाचाराची पुनरावृत्ती होणार नाही : जिल्हाधिकारी

Bhima-Koregaon violence

पुणे – कोरेगाव भीमा येथील विजय रणस्तंभाला 1 जानेवारी रोजी अभिवादन करण्यासाठी असंख्य नागरिक येत असतात. पेरणे येथील कार्यक्रम शांततेत पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज असून यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी नवल किशोर राम आणि पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी केले. पेरणे येथे बैठकआयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. 1 जानेवारी रोजी होणा-या अभिवादन कार्यक्रमाचे नियोजन आणि सामाजिक सलोखा वृध्दींगत व्हावा यासाठी प्रशासनाच्यावतीने बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपविभागीय अधिकारी ज्योती कदम, अतिरिक्त पोलीस अधीक्षक संदीप पखाले, संदीप जाधव,उपविभागीय पोलीस अधिकारी सुहास गरुड, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद, सुभाष जगताप, रुपेश ठोंबरे, लता शिरसाठ, उत्तम भोंडवे,कोरेगाव भिमा विजयरणस्तंभ कृती समितीचे समितीचे अध्यक्ष सर्जेराव वाघमारे, रामभाऊ दाभाडे, माऊली वाळके, राजेंद्र वाघमारे, संजीवनी कापरे आदींसह परिसरातील नागरिक उपस्थित होते.

जिल्हाधिकारी राम म्हणाले, विजय रणस्तंभ परिसरातील नागरिक वर्षानुवर्षे येथे शांततेने,सलोख्याने राहत आहेत. या नागरिकांवर माझा विश्वास असून 1 जानेवारी रोजी होणारा कार्यक्रम शांततेत संपन्न होईल. गेल्या वर्षी झालेल्या घटनेची पुनरावृत्ती होणार नाही, यासाठी प्रशासन दक्ष आहे. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी करण्यात आलेल्या सूचनांची दखल घेण्यात आली असून त्यावर आवश्यक ती कार्यवाही केली जाईल,असेही ते म्हणाले. पेरणे गावाच्या विकासाचा कृती आराखडा तयार करण्यात आला असून या गावाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न केले जातील,असेही ते म्हणाले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विविध विभागांच्या नियमित बैठका घेण्यात येत असून यामध्ये कसूर करणा-यांविरुध्द कार्यवाही केली जाईल, असेही जिल्हाधिकारी राम यांनी स्पष्ट केले.

पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी गेल्या वर्षी पेरणे गावात कोणताही अनुचित प्रकार न घडल्याबद्दल गावक-यांचे कौतुक केले. गावक-यांनी आपल्या कृतीतून सर्वांसमोर एक आदर्श घालून दिला असल्याचे त्यांनी सांगितले. सोशल मिडीयावरुन चुकीचे संदेश प्रसारित करणा-यांविरुध्द पोलीस प्रशासनाचे लक्ष असून अश्या लोकांवर कठोर कारवाई केली जाईल असं देखील त्यांनी यावेळी सांगितले.

मुख्यमंत्र्यांच्या जीवाला धोका- प्रकाश आंबेडकर

दंगलीमुळे बाधित झालेल्या दंगलग्रस्तांना मदत देण्याचा शासन निर्णय जारी