राज्यातील ३० जिल्ह्यांमध्ये नैसर्गिक वायू पोहचविणार – धर्मेंद्र प्रधान

मुंबई : महाराष्ट्र राज्य हे देशाच्या प्रगतीचे इंजिन असून येत्या चार ते पाच वर्षात सुमारे ३० जिल्ह्यात गॅस डिस्ट्रीब्युशन केंद्र (CGD) उभारून नैसर्गिक वायू पोहचविण्यात येईल, असे पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सांगितले. सध्या मुंबई, पुणे, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सोलापूर, कोल्हापूर येथे केंद्र आहेत आता पुढच्या टप्प्यात अहमदनगर, औरंगाबाद, धुळे, नाशिक, लातूर, उस्मानाबाद, सिंधुदुर्ग, सांगली आणि सातारा या ठिकाणी केंद्रे सुरु होणार आहेत.

प्रधान म्हणाले, समृद्धी महामार्ग हा राज्याच्या दृष्टीने महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून या प्रकल्पामुळे सामाजिक आणि आर्थिक प्रगती शक्य होणार आहे. या प्रकल्पासोबतच नैसर्गिक वायू पाईपलाईन टाकल्यास नागपूर आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये गॅस पुरवठा शक्य होणार आहे.

ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये पर्यायी इंधन वापरण्यावर भर देण्याची आवश्यकता श्री. प्रधान यांनी बोलून दाखविली. ते म्हणाले, डिझेलवर चालणारे जनरेटर यांच्यासाठीही पर्यायी इंधन वापरावे. साखरेच्या मळीपासून तयार होणारे इथेनॉल याला देखील मागणी आहे. आता उसाच्या रसापासूनही इथेनॉल बनविण्यासाठी परवानगी देण्यात आली असून रास्त व किफायतशीर भाव (एफआरपी) सह जोडून दोन वर्षांसाठी दर निश्चित करण्याचीही परवानगी देण्यात आली आहे.गावागावात डिझेल पंप, आटा चक्की यांना पर्यायी इंधनावर चालविता आले पाहिजे. सध्या भारत इंधन वापरात जगात तिसऱ्या क्रमांकावर आहे. येत्या वीस वर्षात जगातील सर्वाधिक इंधन वापरणारा देश म्हणून भारत पुढे येणार असल्याचेही ते म्हणाले.

विप्रोचे अझीम प्रेमजीची-मुख्यमंत्री भेट; शासनासोबत विधी सेवा क्षेत्रातील सामंजस्य करार