राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा सरकारला महिन्याभराचा अल्टीमेटम

मोनो सुरू करा अन्यथा गांधी जयंतीला ठिय्या आंदोलन करू – सचिन अहिर

आघाडी सरकारच्या काळात देशातील पहिल्या मोनो रेलच्या दुसऱ्या टप्प्याचे काम पूर्ण झालेले आहे मात्र सरकार मोनो रेलचा दुसरा टप्पा का सुरू करत नाही असा प्रश्न उपस्थित करत महिन्याभराच्या आत मोनो रेलची सुविधा जेकब सर्कलपर्यंत सुरू न केल्यास येत्या गांधी जयंतीला महात्मा गांधी यांच्या मार्गाने एमएमआरडीएच्या ऑफिसमध्ये ठिय्या आंदोलन केले जाईल असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी दिला. मोनो रेलचा जेकब सर्कलपर्यंत दुसरा टप्पा तात्काळ सुरू व्हावा यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मुंबईच्या वतीने आक्रोश रॅलीचे आयोजन केले होते. या रॅलीचे नेतृत्व सचिन अहिर यांनी केले त्यावेळी ते बोलत होते.

पुढे बोलताना अहिर म्हणाले की लोकांचा आक्रोश सरकारपर्यंत पोहोचायला हवा म्हणून ही रॅली आम्ही काढली आहे. कराच्या माध्यमातून मुंबईकरांकडून हजारो कोटी रुपये घेतले जात आहेl मात्र चार वर्षात मुंबईसाठी एकही योजना आणली नाही असा आरोप त्यांनी केला. मुंबईच्या रस्त्यांवर बोलताना रस्त्यांमध्ये खड्डे आहे की खड्ड्यांमध्ये रस्ते तेच कळत नाही अशी टीका त्यांनी केली. मोनो रेल सध्याच्या घडीला मुंबईकरांसाठी गरजेची आहे मात्र ती सुरू केली जात नाही आणि त्याबाबत कोणीही बोलायला तयार नाही. लोकांच्या गरजा लक्षात न घेता फक्त प्रसिद्धीसाठी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून मोनोचा दुसऱ्या टप्प्याचे उद्घाटन केले जाईल असेही ते म्हणाले. चार वर्षात मोनो सुरू करता येत नसेल तर या सरकारचे हे दुर्दैव आहे. या सरकारने देशभराप्रमाणे मुंबईकरांनाही फसवे आश्वासन दिले आहे. सरकारने कोस्टल रोडची घोषणा केली होती कुठे आहे कोस्टल रोड असा सवाल अहिर यांनी उपस्थित केला. हे सरकार गरिबांच्या झोपड्या तोडून मोठ्या पंचतारांकित हॉटेल मालकांचे खिसे भरत आहे. सरकार चहुबाजूने मुंबईकरांची कोंडी करण्याचे काम करत आहे असे ते शेवटी म्हणाले.

You might also like
Comments
Loading...