राष्ट्रवादी कॉंग्रेस घालणार तहसीलदार कार्यालयांसमोर नोटबंदीचे वर्षश्राद्ध

ncp

टीम महाराष्ट्र देशा – नोटबंदीला ८ नोव्हेंबर २०१७ रोजी एक वर्ष पूर्ण होत आहे. त्यामुळे भाजप–शिवसेना युती सरकारच्या नोटबंदी या निर्णयाचे जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील तहसीलदार कार्यालयांसमोर वर्षश्राद्ध घालून प्रतिकात्मक आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड. रविंद्र पगार यांनी दिली आहे.भाजप – शिवसेना युती सरकारने नोटबंदी जाहीर करून ५०० व १००० रुपयांच्या नोटा चलनातून रद्द केल्या.

परंतु दुर्देवाने एवढा महत्वाचा आर्थिक निर्णय घेण्याअगोदर त्यानंतर निर्माण होणाऱ्या परिस्थितीची कोणतीही पुर्वतयारी न केल्याने देशभरातील करोडो नागरिकांना प्रचंड आर्थिक ताण तसेच हाल-अपेष्टांना तोंड द्यावे लागले होते. सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, महिला, विद्यार्थी, युवक यांच्यासह सर्वच समाजघटकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले होते. तसेच कष्टकरी, कामगार, सर्वसामान्य जनता व मोलमजुरी करणाऱ्यांना मोठया प्रमाणावर हाल-अपेष्टांना सामोरे जावे लागले होते.

आपले स्वतःचे हक्काचे पैसे बँकेतून काढण्यासाठी देखील तासनतास मोठमोठ्या रांगेत उभे रहावे लागले होते. अनेकांना यात आपले जीव देखील गमवावे लागले होते. नोटबंदीच्या या निर्णयाला ८ नोव्हेंबर २०१७ रोजी एक वर्ष पूर्ण होत आहे. त्यामुळे सकाळी ११ वाजता सर्व तालुक्यांच्या तहसीलदार कार्यालयांसमोर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने नोटबंदीचे वर्षश्राद्ध घालून आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात पक्षाचे नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी, शेतकरी व हितचिंतक यांनी मोठया संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही अॅड. रविंद्र पगार यांनी केले आहे.