राष्ट्रवादी आक्रमक ! निरंजन डावखरेंविरोधात शरद पवार रिंगणात

niranjan davkhare vr shrad pawar

मुंबई: नुकतेच राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून भाजपमध्ये आलेले निरंजन डावखरे यांच्या विरोधात खुद्द राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार मैदानात उतरले आहेत. विधानपरिषदेच्या कोकण पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक असून राष्ट्रवादी काँग्रेसने ठाण्याचे नगरसेवक नजीब मुल्ला यांना उमेदवारी दिली आहे.

या निवडणुकीच्या रणनीतीसाठी उद्या (बुधवारी) पवारांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक होणार आहे. स्वतः शरद पवार बैठकीला संबोधित करणार आहेत. नवी मुंबईतील विष्णुदास भावे सभागृहामध्ये सकाळी 11 वाजता ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, गणेश नाईक,जितेंद्र आव्हाड यांच्यासह राष्ट्रवादीचे दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत.

राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या त्रासाला व स्थानिक राजकारणाला कंटाळून आपण राष्ट्रवादी पक्ष सोडत आहे. पक्षाने आपल्याला खूप प्रेम दिले असून आपल्याला पक्ष हा कुटुंबासारखा होता, परंतु स्थानिक नेत्यांनी कायमच अनेक अडचणी निर्माण केल्याने व त्याची तक्रार करूनही आपली दखल न घेतल्याने हा आपल्यावर होणार अन्याय आहे, अनेक वर्षे पक्षाचे काम करताना आपण व आपल्या वडिलांनी पक्षासाठी अनेक खस्ता खाल्या आहेत व पक्षवाढीसाठी अनेक प्रयत्न केले आहेत, परंतु स्थानिक नेत्यांना त्याच्याशी काही देणे घेणे नाही व ते आता आपल्याला डावलण्याचा प्रयत्न करत आहेत म्हणून आपण पक्ष सोडण्याचा निर्णय घेत असल्याचे निरंजन डावखरे यांनी सांगितले होते.

कोकण पदवीधर मतदारसंघासाठी ठाणे, नवी मुंबई, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गातून मतदान होणार असून पदवीधर निवडणुकांसाठी २५ जूनला मतदान होणार आहे, तर २८ जूनला मतमोजणी होणार आहे.