देशाची अराजकतेकडे वाटचाल; भाजपा खासदाराचा मोदींना घरचा आहेर

लखनऊ – मोहम्मद अली जिना हे राष्ट्रपुरुषच असल्याची मुक्ताफळे उधळणाऱ्या भाजपा खासदार सावित्रीबाई फुले यांनी मोदी सरकारला पुन्हा एकदा घरचा आहेर दिला आहे. भाजप सरकारच्या काळात देश अराजकतेकडे चालला असल्याची टीका त्यांनी केली.

सावित्रीबाई फुले म्हणाल्या की, ‘दलितांसाठी वंदनीय असलेल्या बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांची विटंबना होत असल्याच्या घटना देशभरात घडत आहेत. मात्र पुतळ्याची विटंबना करणाऱ्यांवर कोणतीही कारवाई होत नाही. हे अराजक नाही, तर काय आहे?,’ असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. फक्त मीच नाही, तर सर्वोच्च न्यायालयातील वकीलदेखील हेच म्हणत असल्याचं त्यांनी सांगितले .

मोदी सरकार संविधानात बदल करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप विरोधकांकडून अनेकदा करण्यात आला आहे. हाच धागा पकडून उत्तर प्रदेशमधील खासदार असलेल्या सावित्रीबाई यांनी स्वत:च्या पक्षावर जोरदार टीका केली. ‘कधी म्हटलं जातं की, आम्ही भारताच्या संविधानात बदल करण्यासाठी आलो आहोत. कधी म्हटलं जातं की, आम्ही आरक्षण काढून टाकू. तर कधी, भारताचं संविधान अशाप्रकारे संपवू की ते असून-नसून सारखंच असेल, अशीही विधानं केली जातात. देशाचं संविधान, आरक्षण संपल्यास फक्त बहुजन समाजच नव्हे, तर संपूर्ण देशातील लोकांचे अधिकार संपुष्टात येतील,’ असं देखील सावित्रीबाई फुले यांनी म्हटलं.

You might also like
Comments
Loading...