‘अब्बाजान’वरून नसिरुद्दीन शाह योगींवर संतापले, म्हणाले..

मुंबई : उत्तर प्रदेशात निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. सार्वजनिक सभांमधून आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी रविवारी कुशीनगर येथे एका सभेला संबोधित केलं. यावेळी त्यांनी विरोधकांवर टीका करण्यासाठी ‘अब्बाजान’ या शब्दाचा वापर केला. यावरून विरोधकांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. तर जेष्ठ अभिनेते नसिरुद्दीन शहा यांनीही आता योगींवर टीका केली आहे.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे हे वक्तव्य आक्षेपार्ह असल्याची प्रतिक्रिया नसिरुद्दीन शाह यांनी एका इंग्रजी वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे. ‘उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांचे ‘अब्बाजान’चे वक्तव्य अपमानास्पद आहे. त्यावर प्रतिक्रियाही देऊ वाटत नाहीये. ही व्यक्ती जी आहे ते आहे. त्यावर प्रतिक्रिया देण्यात काही अर्थ नाही. पण वस्तुस्थिती अशी आहे की, त्यांचं हे ‘अब्बाजान’ वक्तव्य द्वेषयुक्त वक्तव्यांचा भाग आहे जे ते आधीपासून बोलत होते’ अशी टीका शाह यांनी केली.

योगी आदित्यनाथ यांनी समाजवादी पक्षावर टीका केली होती. समाजवादी पार्टीचे नेते मुलायमसिंह यादव यांचे नाव न घेता ते म्हणाले की ‘अब्बाजान म्हणणाऱ्यांनी गरिबांच्या वाट्याला येणारे रेशनचं धान्यही लुटलं. त्या काळी कोणाच्या तरी वाट्याचं रेशन भलत्याच्याच ताटात पडायचं’. योगी आदित्यनाथ यांच्या याच विधानावरून सध्या वादंग निर्माण झाला आहे.

महत्त्वाच्या बातम्या