गिरीश महाजनांना धक्काबुक्की,नाशिकमधील तरुणांनी स्पीडपोस्टद्वारे पाठविला झंडू-बाम

टीम महाराष्ट्र देशा : भाजपसाठी संकटमोचक ठरणारे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या होमग्राउंड जळगावमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी पहायला मिळाली आहे. हाणामारी कार्यकर्त्यांमध्ये अथवा दोन वेगळ्या पक्षातील नेत्यांमध्ये झाली नसून भाजपच्याच जेष्ठ नेत्यांमध्ये झाली आहे.

अमळनेर येथे बुधवारी भाजपच्या मेळाव्यात दोन गटांमध्ये झालेल्या तुंबळ हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांना ट्रोल करण्यात येत आहे.दरम्यान, गिरीश महाजन यांना धक्काबुक्की झाल्याचे समोर आल्याने नाशिकच्या काही तरुणांनी त्यांना चक्क झंडुबाम आणि मलम पाठविला आहे.

अमळनेरच्या मारहाण प्रकरणात मुक्कामार लागलेल्या महाजनांवर उपचार करण्यासाठी नाशिककर तरुणांनी महाजन यांना स्पीडपोस्टद्वारे झंडू-बाम पाठविले आहेत. महाजन यांना अधिकचे उपचार हवे असतील तर त्यांनी मुख्यमंत्र्यांनी दत्तक घेतलेल्या नाशिकमध्ये उपचारासाठी यावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.