नंदुरबार जिल्ह्यातील शहादा मार्गावर नाशिक पोलिसांकडून मद्यसाठा जप्त

नाशिक  : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या नाशिक विभागीय भरारी पथकाने सापळा रचून नंदूरबार जिह्यातील शहादा धडगाव मार्गावर 72 लाखाचे बेकायदेशीर मद्य व दहाचाकीे मालट्रक असा तब्बल 88 लाख 80 हजार 800 रूपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला.नाशिकच्या विभागीय भरारी पथकाने केलेल्या या कारवाईत मालट्रक चालकास बेड्या ठोकण्यात आल्या असून या मद्याची निर्मिती मध्य प्रदेशमध्ये करण्यात आली आहे. मद्य तस्करांकडून ही दारू महसूल बुडवून राज्यात चोरी छुपी वितरीत केले जात असल्याची धक्कादायक माहिती हाती आली आहे.

या बेकायदा मद्यवाहतूकीत राज्य आणि परराज्यातील मोठी टोळी कार्यरत असल्याची माहिती सुत्रांनी दिली. राज्यात विक्रीस बंदी असलेल्या व मध्यप्रदेश निर्मीत विदेशी मद्य साठा मोठ्या प्रमाणात सिमा भागातून वाहतूक होत असल्याची माहिती नाशिक विभागाचे उपायुक्त प्रसाद सुर्वे यांना मिळाली होती. त्यानुसार विभागीय भरारी पथक सतर्क करण्यात आले होते. निरीक्षक एम.बी.चव्हाण व एन.बी.दहिवडे यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथकांने रात्रभर शहादा धडगाव मार्गावर सापळा लावला होता. पहाटे अडीच वाजेच्या सुमारास भरधाव येणारा मद्याची वाहतूक करणारा मालट्रक पथकाच्या हाती लागला. दहाचाकी मालट्रक (एमपी 09 एचएफ 2625) वरील चालकास पिंप्री फाटा येथे थांबलेल्या पथकाच्या कर्मचा-यांनी थांबण्याचा इशारा केला मात्र त्याने ट्रक न थांबवता भरधाव पळवला.

यामुळे पथकाने पुढील यंत्रणा सतर्क करीत पाठलाग करून मालट्रक अडवला. त्यावरील चालक सरदारलाल मांगीलाल सुर्यवंशी याला अटक केले. या मालट्रकच्या झडतीत ट्रक मध्ये मध्य प्रदेश निर्मीत बॉम्बे स्पेशल व्हिस्की आणि लीमाऊंट प्रिमीयम स्ट्रॉग बिअर असा 71 लाख 80 हजार 700 रूपये किमतीचा मद्यसाठा मिळून आला. पथकाने मद्यसाठ्यासह मालट्रक असा सुमारे 88 लाख 80 हजार 800 रूपयांचा मद्यसाठा हस्तगत केला. याप्रकरणी महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास निरीक्षक एम.बी.चव्हाण करीत आहेत.

You might also like
Comments
Loading...