मुंढे इफेक्ट; पालिकेत युद्धपातळीवर स्वच्छता मोहीम

tukaram-mundhe-

नाशिक – आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नाशिक महापालिकेतील धमाकेदार एन्ट्रीनंतर धास्तावलेली महापालिकेची यंत्रणा सुटीच्या दिवशीही अक्षरश: कार्यप्रवण झाली. स्वच्छतेच्या मुद्यावरून मुंढे यांनी कर्मचारी मंडळीना खडे बोल सुनावले होते. यामुळे शनिवारी महापालिकेच्या राजीव गांधी भवन मुख्यालयात सर्व विभागांमध्ये युद्धपातळीवर स्वच्छतेचे काम हाती घेण्यात आले. रात्री उशिरापर्यंत चाललेली ही मोहीम रविवारी सुरू राहण्याची शक्यता आहे.

मुंढेंच्या धास्तीने सुटीच्या दिवशी पालिकेतील चित्र बदलले. एरवी कामाच्या दिवशी पालिकेत न रमणारे अधिकारी-कर्मचारी शनिवारी सकाळपासून हजर झाले. मुख्य लेखा परीक्षक महेश बच्छाव यांनी सकाळी विभागप्रमुख-कर्मचाऱ्यांना ‘सिक्स बंडल सिस्टीम’विषयी मार्गदर्शन केले. कागदपत्रांची वर्गवारी कशी करावी, दस्तावेज, शासकीय अध्यादेश कसे जतन करावे, नोंदी कशा ठेवाव्यात, अहवाल कसा तयार करावा आदींबद्दल माहिती दिली.

हा अभ्यास वर्ग झाल्यानंतर अधिकारी-कर्मचाऱ्यांचा मोर्चा आपापल्या विभागाकडे वळला. प्रत्येक विभागात स्वच्छतेचे काम सुरू झाले. अस्ताव्यस्त पडलेल्या फाईलच्या गठ्ठय़ांवरील धूळ झटकली गेली. त्यांची वर्गवारी करणे, यासह पंखे, संगणक, टेबलची साफसफाई, भिंतीवरील जळमटे काढत साफसफाई सुरू झाली. बहुतांश विभागातून मोठय़ा प्रमाणात कचरा बाहेर काढण्यात आला.