महाराष्ट्राचा मावळा करणार दिल्लीत संचलन

naresh hiraman

पुणे / अपूर्व कुलकर्णी: येथील सर परशुरामभाऊ महाविद्यालयाचा विद्यार्थी नरेश हिरामण येवले याची २६ जानेवारी २०१८ रोजी राजपथ (दिल्ली) येथे होणाऱ्या राष्ट्रीय पदसंचलनासाठी (NRD) निवड झाली आहे. महाराष्ट्राचा हा रांगडा मावळा दिल्लीत राज्याचं प्रतिनिधित्व करणार आहे.

त्याच्या या यशस्वी प्रवासाविषयी बोलतांना त्याने सांगितले की, पहिले राष्ट्रीय सेवा योजनेच्या (NSS) राज्य पातळीवरील संचलनासाठी त्याची निवड झाली. बार्शी (जि. सोलापूर) येथील पुढील निवड चाचणी यशस्वीरीत्या पूर्ण करून त्याने हैदराबाद येथे झालेल्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या कॅम्पमध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले. तिथून एकूण ४० जणांची दिल्ली येथे होणाऱ्या संचलनासाठी निवड झाली. यात महाराष्ट्रातून निवड झालेल्या ३ जणांमध्ये नरेशचे नाव आले. पुणे जिल्ह्यातून निवड झालेला तो एकमेव विद्यार्थी आहे. त्याच्या निवडीमुळे दिल्लीत महाराष्ट्राची मान उंचावणार आहे.

आपल्या म्हणण्यातून त्याने संधी दिल्याबद्दल महाविद्यालय आणि राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे विशेष आभार मानले. तसेच प्रत्येक वेळी आई आणि मोठा भाऊ ह.भ.प. कैलास महाराज येवले हे दोघे भक्कमपणे पाठीशी उभे होते असेही तो म्हणाला.

त्याच्या या उत्तुंग यशाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिलीप शेठ यांनीही त्याचे कौतुक केले. त्याला महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागप्रमुख प्रा. डॉ. विलास उगले आणि २०१६ साली दिल्लीत संचलन केलेले महेश गोफणे यांचे मार्गदर्शन लाभले.