अन्यथा मराठा युवकांसाठी आम्हाला झेंडा हातात घेऊन दांडा काढावा लागेल : नरेंद्र पाटील

टीम महाराष्ट्र देशा : बॅंक अधिकाऱ्यांनी मराठा युवकांची अडवणूक करू नये. हे अधिकारी मनमानी कारभार करीत असून, त्यांना गोडीत सांगू, नाहीतर मराठा क्रांती मोर्चासारखे एकत्र येऊन नीट करू. मराठा समाजाचे युवक उद्योजक व्हावेत, यासाठी बॅंकांनी पुढाकार घ्यावा, अन्यथा आम्हाला झेंडा हातात घेऊन दांडा काढावा लागेल, असा इशारा अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी बॅंक अधिकाऱ्यांना दिला.

अहमदनगर जिल्यातील अकोले पंचायत समितीच्या कार्यालयात मराठा युवक व बॅंक अधिकारी यांची संयुक्त बैठक झाली. या वेळी पंचायत समितीचे सभापती दत्तात्रय बोऱ्हाडे, तहसीलदार मुकेश कांबळे, प्रभारी गटविकास अधिकारी सचिन कोष्टी तसेच अधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताने नरेंद्र पाटील म्हणाले, मराठा समाजातील युवकांनी रोजगार उपलब्ध व्हावा, यासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळ बिगरव्याजी कर्ज योजना राबविण्यात येत आहे. बॅंकेत अनेक अडचणी येतात. अधिकारी कर्ज प्रकरणे मंजूर करीत नाहीत, अशा तक्रारी युवकांकडून येत आहेत.

त्यामुळे  बॅंक अधिकाऱ्यांनी या युवकांना सहकार्य करावे. मराठा समाजाच्या युवकांना दहा लाखांपर्यंत कृषी संलग्न व पारंपरिक लघू उद्योगासाठी कर्ज पुरवठा केला जाणार आहे. सरकारकडून लाभार्थ्यांच्या व्यक्तिगत खात्यावर व्याज परतावा जमा होणार आहे. आर्थिक दुर्बल युवकांमध्ये रोजगार व उद्योजकता वाढविण्यासाठी सरकारने नवीन योजना आणल्या आहेत.

छत्रपती राजाराम महाराज अभियानातंर्गत या योजनांमध्ये कृषी संलग्न व पारंपरिक उपक्रमासह लघू व मध्यम उद्योगांचा कर्ज योजनेत समावेश आहे. कृषी संलग्न व पारंपरिक व्यवसायासाठी दहा लाखांची कर्ज मर्यादा आहे. लाभार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज सादर केला आणि त्याला सरकारने मंजुरी दिल्यानंतरच बॅंकेकडून कर्ज मंजूर होणार आहे. युवकांनी याबाबत काळजी घ्यावी.

हेही पहा