fbpx

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे : मोहन जोशी

पुणे : ‘स्वर्गीय पंतप्रधान राजीव गांधी यांच्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेली टीका ही सभ्यतेच्या आणि सुसंस्कृतपणाच्या मर्यादा ओलांडणारी आहे. अशी वक्तव्ये नरेंद्र मोदी यांचे मानसिक संतुलन बिघडल्याचे द्योतक आहे. गमावलेला आत्मविश्वास, घसरलेली जीभ आणि विरोधकांच्या बाबतीत वापरले जात असलेले शब्द यातुन लोकसभेच्या निवडणुकीत त्यांचा पराभव नक्की होणार, हे त्यांनी मान्य केल्यासारखे आहे’ अशी टीका प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते, ज्येष्ठ नेते उल्हास पवार आणि पुणे लोकसभेचे काँग्रेसचे उमेदवार मोहन जोशी यांनी केली.

उल्हास पवार म्हणाले, ‘स्वर्गीय राजीव गांधी यांच्याबद्दल नरेंद्र मोदी यांनी वापरलेली भाषा अतिशय असभ्य, बदनामीकारक आणि खोटारडेपणाची आहे. त्यांच्या कर्तृत्वाची अवहेलना करणारी आहे. संस्कृतीचा टेम्भा मिरवणाऱ्या नरेंद्र मोदींना ‘मरणांती वैराणी’ हे भारतीय संस्कृतीतील मूलभूत तत्वज्ञानाचे भान राहिलेले नाही. पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांच्याबद्दल पराकोटीचा द्वेष मोदींच्या मनामध्ये शब्दाशब्दातुन रोज प्रगट होत आहे’.

‘स्वर्गीय पंतप्रधान भारतरत्न इंदिरा गांधी, स्वर्गीय पंतप्रधान राजीव गांधी यांनी देशाच्या ऐक्यासाठी, अखंडत्वासाठी दहशतवादाशी लढताना प्राणार्पण केले. त्यांच्या देहाचे तुकडे, शरीराची झालेली चाळण आणि भारतभूमीवर सांडलेले त्यांचे रक्त मोदींनी पाहिलेले नाही. देशासाठी त्यांचा त्याग माहित असूनही अशा प्रकारचे टोकाच्या द्वेषभावनेतून उदगार काढणे हे केवळ पराभूत मनोवृत्तीचे लक्षण आहे. मोदी यांच्या मनात असलेला द्वेष भारतीयांनी पाहिला आहे. अशा प्रकारे द्वेषाने आणि अहंकाराने भरलेला पंतप्रधान देशाने याआधी कधी पहिला नाही.’

‘मोदींची भाषणे हुकूमशाहीची, द्वेषाची आणि विघटनकारी शक्तींना बळ देणारी आहेत. राजीव गांधींच्या योगदानामुळेच २१ व्या शतकात भारत जगाच्या नकाशावर उल्लेखनीय कामगिरी करीत आहे. संगणक, मोबाईल आणि इंटरनेट या डिजिटल क्रांतीचे ते जनक आहेत. याऊलट मोदींच्या काळात नोटबंदी, जीएसटी यामुळे देशाची आर्थिक घडी विस्कळीत झाली आहे, असे स्पष्ट मत माजी पंतप्रधान आणि अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहन सिंग यांनी व्यक्त केले आहे. अमेठी आणि रायबरेलीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ताळतंत्र सोडून प्रधानसेवक नरेंद्र मोदी टीका करीत आहेत. स्मृती इराणी यांना सहानुभूती मिळावी, याकरिता खालच्या पातळीची भाषा करीत आहेत, हे दुर्दैवी आहे.

‘सोनिया गांधी यांच्या मनाला वेदना देत राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्या पितृशोकावर मीठ चोळण्याचे काम मोदी करीत आहेत. याची जाणीव कौटुंबिक पार्श्वभूमीपासून दूर असलेल्या मोदींना नाही. राजकीय स्वार्थापोटी पातळी सोडून बोलणाऱ्या मोदींना आणि भारतीय जनता पक्षाला सांस्कृतीचे देणेघेणे नाही. स्वर्गीय पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी इंदिराजी आणि राजीवजी यांच्या निधनानंतर वाहिलेल्या श्रद्धांजलीवेळीचे उद्गार मोदींच्या वाचनातही आले नसतील. सुसंस्कृतपणाचा आव आणणाऱ्या पक्षाचा असंस्कृत पंतप्रधान हेच ब्रीद वाक्य घेऊन भारतीय जनता पार्टी ‘पार्टी विथ डिफरंन्स’चा फार्म्युला देत आहे,’ असेही उल्हास पवार आणि मोहन जोशी यांनी नमूद केले.