बाळासाहेब लाखो जनतेसाठी आजही प्रेरणादायी आहेत : मोदी

टीम महराष्ट्र देशा : शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांची आज 94 वी जयंती आहे. यानिमित्त शिवाजी पार्क येथील बाळासाहेब ठाकरे यांचं स्मृतीस्थळ फुलांनी सजवण्यात आलं आहे. त्यांना अभिवादन करण्यासाठी शिवसैनिक शिवाजी पार्ककडे ओढ घेत आहेत. तसंच देशभरातील दिग्गज नेत्यांकडूनही बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करण्यात येत आहे.

दरम्यान, जयंतीनिमित्त बाळासाहेब ठाकरे यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिवादन केलं आहे. ‘महान बाळासाहेब ठाकरे यांना जयंतीनिमित्त अभिवादन. धैर्यवान बाळासाहेबांनी लोकांच्या प्रश्नांना आवाज देताना कधीही मागे-पुढे पाहिले नाही. भारतीय मुल्यांबद्दल त्यांना नेहमीच अभिमान होता. ते लाखो लोकांना प्रेरणा देत राहतील,’ अशा शब्दांत नरेंद्र मोदी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

याचप्रमाणे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ट्विटरवरुन बाळासाहेबांना अभिवादन केलं. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिवाजी पार्कवरील बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळी जाऊन सकाळी आठ वाजताच मानवंदना दिली.

तसेच ‘कठोर अन् प्रेमळ. प्रेरणादायी अन् उर्जावान. हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सदैव मार्गदर्शन करीत राहतील.’ असं ट्वीट माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. ‘महाराष्ट्राचं वैभव, ज्वलंत विचारांचा ‘मार्मिक’ ठेवा, हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन.!’ असं दुसरं ट्वीटही पाठोपाठ फडणवीसांनी केलं आहे.