मोदीजी, तुम्ही बोलता खूप करत काहीच नाही : राहुल गांधी

rahul gandhi and narendra modi

वृत्तसंस्था-  “मोदीजी तुम्ही बोलता खूप मात्र करत काहीच नाही, भ्रष्टाचारी रेड्डी बंधुंना भारतीय जनता पक्षाने 8 तिकिटे दिली आहेत. यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 5 मिनीटे बोलून दाखवावे”, असा हल्लाबोल काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधानांवर केला.

कर्नाटक विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपने भ्रष्टाचारी नेत्यांना तिकिटे दिली असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला. तसेच भ्रष्टाचारी रेड्डी बंधूना तिकीटे देण्याबरोबरच 23 खटले असणारे येडियुरप्पा हे भाजपचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार आहेत. कर्नाटकच्या महत्वाच्या 11 नेत्यांवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप आहेत. यावर मोदी काही बोलणार आहेत का, असा प्रश्नही राहुल यांनी उपस्थित केला. याबाबत ते कुठलाही निर्णय घेणार नाहीत, असे त्यांनी स्पष्ट केले.

राफेल करार, नीरव मोदी या विषयावर मोदी संसदेत 5 मिनिटेसुद्धा बोलू शकणार नाहीत, असे राहुल गांधी म्हणाले होते. यावर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या असे राहुल गांधी यांनी 5 वेळा बोलून दाखवावे असे म्हणून याआधी पंतप्रधान मोदींनी राहुल गांधींना लक्ष्य केले होते.

कर्नाटक विधानसभेच्या प्रचार आता शिगेला पोहोचला आहे. पंतप्रधान मोदी यांनी राहुल गांधी यांना हातात कागद न घेता 15 मिनिटे बोलून दाखवण्याचे आव्हान केले होते. आता याउलट राहुल गांधींनी काही ठराविक मुद्द्यांवर पंतप्रधान मोदींना बोलण्याचे आव्हान केले आहे.