मोदींनी साध्वीला अजून माफ केलं नाही, संसदेच्या सेंट्रल हॉलमधील बैठकीत साध्वीला झिटकारलं

टीम महाराष्ट्र देशा : १७ व्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजप आणि मित्र पक्षांना घवघवीत यश मिळाल्यानंतर शनिवारी संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित सर्व खासदारांना संबोधित केले. तर नवनिर्वाचित खासदारांनी नरेंद्र मोदींची एनडीएच्या नेतेपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले.

या कार्यक्रमात खळबळ जनक वक्तव्यांनी भाजपला निवडणुकीच्या काळात अडचणीत आणणाऱ्या साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांना मोदींनी दुर्लक्षित केले. त्यामुळे मोदींनी अजूनही ठाकूर यांना माफ केले नसल्याची चर्चा सर्वत्र सुरु आहे. लोकसभा निवडणुकीत भोपाळ लोकसभा मतदार संघात भाजपकडून साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र उमेदवारी मिळताच साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी शहीद हेमंत करकरे, बाबरी मस्जिद आणि नथुराम गोडसेबद्दल काही बेलगाम वक्तव्य करत भाजपला अडचणीत आणले होते.

त्यांनतर पक्षावर आणि साध्वी यांच्यावर मोठ्याप्रमाणात टीका करण्यात आली. त्याबाबत प्रज्ञासिंह ठाकूर यांनी माफी सुद्धा मागितली. मात्र गोडसेंबाबतच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे पंतप्रधान मोदी विशेष नाराज झाले होते. जरी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी माफी मागितली असली तरी, मी त्यांना मनापासून कधीच माफ करणार नाही, असं मोदी म्हणाले होते. त्याची प्रचिती शनिवारी सेंट्रल हॉलमध्ये झालेल्या बैठकीत आली.

मोदींची एनडीएच्या नेतेपदी निवड झाल्यानंतर सर्व खासदारांनी त्यांचे अभिनंदन केले. त्याचवेळी साध्वींनी मोदींना अभिवादन केलं. मात्र, मोदींनी त्यांच्याकडे साफ दुर्लक्ष केलं. त्यामुळं मोदींनी साध्वींना अजूनही माफ केलं नाही, अशीच चर्चा राजकीय वर्तुळात दिवसभर रंगली होती.