fbpx

नरेंद्र मोदी म्हणतात ‘अबकी बार 300 पार’ ही जनतेचीचं इच्छा

टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप पक्षानी कंबर कसून प्रचार केला आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून देशभरातून एनडीएला मागच्या वेळेसपेक्षा यंदा सर्वाधिक जागा मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत नरेंद्र मोदींनी मागच्या लोकसभा निवडणुकीपेक्षा यावेळी एनडीएच्या जागा वाढतील, असा दावा केला आहे. तसेच यावेळी मोदींनी राष्ट्रवाद, महागाई, गरीबी, रोजगार, पुलवामा दहशतवादी हल्ला अशा व्यापक मुद्यांवर देखील भाष्य केले.

यावेळी मोदी म्हणाले की, गेल्या निवडणुकीपेक्षा यावेळी एनडीएच्या जागा वाढतील. मित्रपक्षांनाही चांगलं यश या निवडणुकीत मिळेल. देशातील जनता भाजपसह मित्रपक्षांच्या पाठीशी आहे. त्यामुळे एनडीए सत्तेत येणार ही जनतेचीच इच्छा आहे. अबकी बार 300 पार अशा घोषणा लोकांकडून दिल्या जात आहेत. यावर बोलताना मोदी म्हणाले की, जनतेच्या तोंडून जो आवाज निघतो त्याचा सन्मान केला पाहिजे.

तसेच राष्ट्रवादावर बोलताना मोदी म्हणाले की, देशातील शेतकऱ्यांचं कल्याण करणे ही माझी राष्ट्रभक्ती आहे असून हाच माझा राष्ट्रवाद आहे. भारतीय लष्कर सक्षम, सामर्थ्यवान बनावं त्यांना कोणत्याही साधनांची कमी भासू नये ही माझी राष्ट्रभक्ती आहे. मसूद अझहरला दहशतवादी घोषित करणे हीच राष्ट्रभक्ती आहे. काँग्रेसच्या काळात विकासाची गती कमी झाली होती, तो विकास करणे ही राष्ट्रभक्ती आहे, अशी राष्ट्रवादाची व्याख्या नरेंद्र मोदींनी सांगितली.

ज्या प्रकारे गेल्या पाच वर्षात आमच्या सरकारने कामे केली, त्यानुसार आम्ही पुन्हा पूर्ण बहुमताने सत्तेत येऊ तसेच मागच्या लोकसभा निवडणुकीत ज्या राज्यांमध्ये आम्हाला कमी जागा मिळाल्या होत्या, तिथेही आमच्या जागा वाढतील, असा दावा नरेंद्र मोदींनी यावेळी केला.