नरेंद्र मोदींना पुण्यात आली बाळासाहेब ठाकरेंची आठवण !

टीम महाराष्ट्र देशा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज पुणे मेट्रोच्या तिसऱ्या मार्गाचे भूमिपूजन करण्यात आले आहे. यावेळी पंतप्रधानांनी मराठीमध्ये भाषणाला सुरुवात करताना छत्रपती शिवाजी महाराज, बाजीराव पेशवे यांना प्रणाम केले. विशेष म्हणजे पुणे हे लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश गोखले यांच्यासह बाळासाहेब ठाकरेंची जन्मभूमी असल्याचा उल्लेख पंतप्रधानांनी आवर्जून केला.

केंद्र सरकार आणि राज्यातील सरकार पुण्याच्या विकासासाठी काम करत आहे. केंद्र सरकारकडून पीपीपी मॉडेलवर राबवला जाणार हा पहिला मेट्रो प्रकल्प आहे. सरकारने केलेल्या पॉलिसीमुळे देशभरात मेट्रोच्या कामांना गती आली आहे. मेट्रोच्या उभारणीसोबतच स्टेशनला बस आणि इतर सुविधांनी जोडले जात आहे. मेट्रो ही आता देशाची लाईफलाईन बनत आहे. देशात होणाऱ्या मेट्रोच्या विस्ताराला अटल बिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळात सुरवात झाली होती, ज्याला आम्ही गती दिली. वाजपेयी सरकारला अजून वेळ देण्यात आला असता तर सर्व कामे मार्गी लागली असती.

आम्ही एक भारत श्रेष्ठ भारत बनवण्यासाठी प्रयत्न करत आहोत. 2004 च्या तुलनेत 2014 मध्ये एका पिढीचे अंतर निर्माण झाले आहे. जुन्या सरकारने दळणवळणावर लक्ष दिले नाही, त्यांचे विचार त्यांच्या सोबत राहो पण आम्ही देशाचा विकास करत आहोत, असंही मत पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केले. दरम्यान, भूमिपूजन कार्यक्रमाला राज्यपाल सी विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, पालकमंत्री गिरीश बापट, खा. अनिल शिरोळे, पुणे आणि पिंपरी चिंचवडचे महापौर उपस्थित होते

यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “हिंजवडी हा देशाला सर्वाधिक विदेशी निर्यात मूल्य देणारा परिसर आहे, मात्र येथील लोकांना आपले तासंतास वाहतूक कोंडीत घालवावे लागतात. त्यामुळे आम्ही या भागात मेट्रो निर्माणाचे काम सुरू केले आहे. केंद्र सरकरकडून पीपीपी तत्वावर राबवला जाणार हिंजवडी मेट्रो प्रकल्प हा पहिला आहे. पीएमआरडीएचा कायदा कधीच मान्य झाला मात्र मागील सरकारमधील अंतर्गत वादामुळे काम पूर्ण होऊ शकले नाही. येत्या काळात म्हाळुंगे मान हायटेकसिटी सारखा प्रकल्प उभारला जाणार आहे. त्यामुळे येत्या काळात हा परिसर राज्याच्या विकासाचा केंद्रबिंदू असेल”.