राज्यात पुन्हा स्थिर सरकार आणायचे असेल तर देवेंद्र फडणवीसांना पुन्हा निवडून द्या : पंतप्रधान मोदी

टीम महाराष्ट्र देशा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेचा आज नाशिक येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत समारोप झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी विधनसभा निवडणुकीच्या तोंडावर आज काय घोषणा करणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यावेळी उपस्थितांना संबोधित करताना देशाच्या समग्र विषयावर भाष्य केले. जम्मू काश्मीरच्या विकासासाठी आता संपूर्ण भारतीयांनी एकत्र आले पाहिजे,असे आवाहन मोदींनी यावेळी केले. तर राज्यात पुन्हा स्थिर सरकार आणायचे असेल तर देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा निवडून द्या, असेही मोदी म्हणाले

कोणतेही सरकार पाच वर्षे चाललं नाही. वसंतराव यांच्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी पाच वर्षे महाराष्ट्राची सेवा केली, असे म्हणत नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्र्यांचे कौतुक केले. गुजरात महाराष्ट्राचा छोटा भाऊ आहे. कधीकाळी दोन्ही राज्यातील लोकांनी एका थाळीमध्ये जेवण केल आहे. देशात गुजरातने सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहण्याचा बहुमान मला दिला होता. त्याप्रमाणे आपण देवेंद्र फडणवीस यांना तो बहुमान द्यावा, असे आवाहन मोदींने केले.

राजकीय अस्थिरतेमुळे महाराष्ट्राने जी प्रगती करायला हवी होती ती झाली नाही. मात्र राज्यात पूर्ण बहुमत नसताना देवेंद्र फडणवीस यांनी स्थिर सरकार दिले. मागील पाच वर्षात महाराष्ट्रात गुंतवणुकीचं चांगलं वातावरण मिळालं, शेतकऱ्यांना चांगल्या सुविधा मिळाल्या. शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये २० हजार कोटींपेक्षा जास्त निधी जमा करण्यात आला आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी आपली राज्याच्या जनतेप्रती असलेली भूमिका निभावली आहे, असे मोदी म्हणाले.

दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या लक्षवेधी सभेला भाजपमध्ये नुकतेच दाखल झालेले सातारचे माजी खा. उदयनराजे भोसले देखील व्यासपीठावर उपस्थित आहेत. यावेळी उदयनराजे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे छत्रपतींची पगडी भेट देत स्वागत केले. तसेच यावेळी नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, केंद्रीय मंत्री रामदास आठवले आदी मान्यवर उपस्थित आहेत.