fbpx

राहुल गांधींनी केलेले आरोप बिनबुडाचे- रविशंकर प्रसाद

नवी दिल्ली : ऑगस्टा वेस्टलँड घोटाळ्यावरील लक्ष हटवण्यासाठी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींकडून आता पंतप्रधानांना लक्ष्य केलं जात आहे, असं प्रत्युत्तर रविशंकर प्रसाद यांनी  राहुल गांधींच्या आरोपांना दिलं आहे. केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांनी पत्रकार परिषद घेऊन राहुल गांधींनी गुजरातच्या सभेत केलेल्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं. राहुल गांधींनी केलेले आरोप बिनबुडाचे असल्याचं भाजपने स्पष्ट केलं.

दरम्यान राहुल गांधींच्या या आरोपाचा ऑगस्टा वेस्टलँड घोटाळ्याच्या चौकशीवर कसलाही परिणाम होणार नसून सीबीआयकडून चौकशी सुरुच राहिल, असं रविशंकर प्रसाद यांनी स्पष्ट केलं.महाराष्ट्र, चंदीगड, गुजरातमध्ये स्वतःच्या नेतृत्वात पराभव झाल्यामुळे राहुल गांधी हताश झालेले आहेत. त्याचा राग काढण्यासाठी अशा बिनबुडाच्या आरोपांचा आधार घेतला जात असल्याचा टोला रविशंकर प्रसाद यांनी लगावला.

राहुल गांधींनी होमवर्क करुन सभेत बोलत जावं, असंही रविशंकर प्रसाद म्हणाले. राहुल गांधी स्वतःच 5 हजार कोटींच्या नॅशनल हेराल्ड घोटाळ्यात जामिनावर असून देशाच्या पंतप्रधानांवर आरोप करत आहेत. त्यांनी कोणावर आरोप करण्यापूर्वी आपल्या पक्षाचा इतिहास पाहावा, असंही रविशंकर प्रसाद म्हणाले.