मोदींच्या हस्ते अबुधाबीत पहिल्या हिंदू मंदिराचं भूमिपूजन

Screenshot (1) modi in abudabhi

दुबई: यूएईच्या दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी दुबईतील ओपेरा हाऊसमध्ये पोहोचले. तेथून त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे अबूधाबीतील पहिल्या हिंदू मंदिराचे भूमिपूजन केले. बीएपीएस संस्थेद्वारे हे मंदिर उभारण्यात येत आहे.

यावेळी मोदींनी यूएईमध्ये राहणाऱ्या भारतीयांना संबोधित केले. ‘अनेक दशकांनंतर भारताचे आखाती देशांसोबतचे नाते इतके दृढ झाले आहे. भारत ‘इज ऑफ डुइंग बिझनेस’मध्येही प्रगती करत आहे. ३० लाखांहून अधिक भारतीय नागरिक येथील विकासाचे भागीदार झाले आहेत, याचा सार्थ अभिमान वाटतो.’, असे मोदी म्हणाले.

 

अबुधाबी येथील हिंदू मंदिराच्या पायाभरणीचा सोहळा पार पडल्यानंतर मोदींनी भारतीय समुदायाशी संवाद साधला. हिंदू मंदिर उभारणीस मान्यता दिल्याने मी भारतातील सव्वाशे कोटी जनतेच्या वतीने अबूधाबीचे राजे मोहम्मद बिन झायेद अल नहयान यांचे आभार मानतो, असे मोदी म्हणाले. सव्वाशे कोटी भारतीयांच्या वतीने मोदींनी वली अहद शहजादा मोहम्मद बिन जायद अल नाहयान यांचे आभार व्यक्त केले.’हे हिंदू मंदिर फक्त वास्तुकला आणि भव्यतेच्या दृष्टीनेच अद्भूत नसेल, तर यातून वसुधैव कुटुंबकम हा संदेशही अख्ख्या जगाला मिळेल.’ असा विश्वासही पंतप्रधानांनी यावेळी व्यक्त केला.50 हजार चौरस मीटर जागेवर अबुधाबीत पहिलं हिंदू मंदिर तयार होणार आहे. भारतीय शिल्पकार याची रचना करत असून 2020 पर्यंत मंदिर बांधून पूर्ण होईल. सर्वधर्मीयांसाठी हे मंदिर खुलं असेल, असंही मोदींनी सांगितलं.

स्वामीनारायण संप्रदायातर्फे हे मंदिर बांधण्यात येणार असून संप्रदायाच्या साधूंनी मोदी आणि युवराज मोहम्मद बीन झायेद यांची भेट घेऊन मंदिराची माहिती दिली.

मंदिराची वैशिष्ट्ये

– 55 हजार स्क्वे. मीटर जमिनीवर मंदिराचं बांधकाम

– भारतीय शिल्पकार करतायेत मंदिराचं बांधकाम

– मंदिराचं काम 2020 पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा

– दगडांनी बांधकाम करण्यात येणारं पहिलं हिंदू मंदिर

-कृष्ण, शंकर, अयप्पासह आणखी काही देवांच्या मूर्ती असतील

-मंदिराच्या परिसरात सुंदर बगीचा असेल

– मंदिर परिसरात पर्यटन केंद्र, प्रार्थनेसाठी जागा आणि मुलांना खेळण्यासाठी जागा असेल

– विविध विषयांशी संबंधित बगीचे असतील

-फूड कोर्ट, पुस्तके आणि अन्य दुकाने असतील