चार वर्षांपासून अघोषित आणीबाणी लादणाऱ्या नरेंद्र मोदींना लोकशाहीवर गप्पा मारण्याचा नैतिक अधिकार नाही: अशोक चव्हाण

narendra modi and ashok chawan

गेल्या चार वर्षांपासून देशावर अघोषीत आणीबाणी लादणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना लोकशाहीच्या गप्पा मारण्याचा नैतिक अधिकार नसल्याची टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केली आहे.

यासंदर्भात बोलताना खा. चव्हाण म्हणाले की, देशात भाजपचे सरकार सत्तेवर आल्यापासून दलित, अल्पसंख्यांक, आदिवासी यांना वेठीस धरले जात आहे. त्यांच्यावरील अत्याचारात प्रचंड मोठी वाढ झाली आहे. दिवसाढवळ्या पत्रकार, विचारवंत, लेखकांच्या हत्या केल्या जात आहेत. देशाची अर्थव्यवस्था डबघाईला आलेली आहे. बेरोजगारीत बेसुमार वाढ होत आहे. सरकारच्या चुकीच्या धोरणांविरोधात बोलणा-यांना देशद्रोही ठरवले जात आहे. कोणी काय खायचे, कोणते कपडे घालायचे यावर नियंत्रणे आणली जात आहेत. गोमांस बाळगल्याच्या संशयावरून हत्या केल्या जात आहेत. देशातल्या घटनात्मक संस्थाची स्वायत्तता मोडीत काढली जात आहे. न्यायव्यवस्थेवरही सरकारकडून दबाब आणला जात आहे. एकंदरीतच आज देशात आणीबाणीची परिस्थिती असून याविरोधात देशातल्या जनतेमध्ये तीव्र असंतोष असून यावरून जनतेचे लक्ष दुसरीकडेच वळविण्यासाठी भाजपकडून 43 वर्षापूर्वीच्या आणीबाणीचा संदर्भ देऊन काळा दिवस साजरा केला जात आहे. पण मोदींच्या कार्यकाळात गेल्या चार वर्षापासू देशातली जनता काळे दिवस भोगते आहे असे खा. चव्हाण म्हणाले.

इंदिरा गांधी, राजीव गांधी यांनी या देशातली लोकशाही बळकट केली म्हणूनच एक चहावाला या देशाचा पंतप्रधान होऊ शकला हे नरेंद्र मोदी कसे विसरू शकतात? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरसंघचालक के. सुदर्शन यांनी इंदिरा गांधी सारखा दुसरा नेता झाला नाही, अशा शब्दात त्यांची स्तुती केली होती. माजी सरसंघचालक बाळासाहेब देवसरांसहित वाजपेयींसारख्या अनेक नेत्यांनी माफीनामा लिहून देत 20 कलमी कार्यक्रमाला पाठिंबा दिला होता. हे भाजपने विसरू नये असे भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी स्वतःच म्हटले आहे. आरएसएस आणि भाजपच्या नेत्यांना आणीबाणी बद्दल बोलण्याचा हक्क नाही. स्वतःच्या सरकारचे गेल्या चार वर्षातील सर्वच आघाड्यांवरचे अपयश झाकण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप काँग्रेस विरोधात अपप्रचार करित आहे. काँग्रेस त्यांच्या या अपप्रचाराला सडेतोड प्रत्युत्तर देईल असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.