‘जुमलेबाजी बंद करो! च्या घोषणेतही मोदींचे दीड तास भाषण

narendra-modi

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणावरील आभारदर्शक ठराव आज (बुधवार) लोकसभेत मांडला. दरम्यान विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे लोकसभेत गोंधळ निर्माण झाला होता. नरेंद्र मोदींचे भाषण संपेपर्यंत विरोधकांनी घोषणा दिल्या. घोषणाबाजीमुळे पंतप्रधान मोदी यांना भाषण करता येत नव्हते.

‘बंद करो.. बंद करो संसद मे ड्रामाबाजी बंद करो,’ ‘बंद करो.. बंद करो, जुमलेबाजी बंद करो’, अशा घोषणा विरोधकांनी देऊन सभागृह दणाणून सोडला. नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणाचा सन्मान व्हायला हवा, माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न करू नका. अशे म्हणत अवघे दीड तास भाषण केलं. राष्ट्रपतींच्या अभिभाषणाला सन्मान देण्यासाठी भाजपने आपल्या सर्व खासदारांना सभागृहात उपस्थित राहण्याच्या सूचना दिल्या होत्या.

नरेंद्र मोदी म्हणाले,काँग्रेसने सरदार पटेल यांच्यावर अन्याय केला. सरदार पटेल पंतप्रधान असते तर काश्मीर प्रश्नच निर्माण झाला नसता आणि संपूर्ण काश्मीर आज भारताचाच भाग असता, देशातील लोकशाही ही काँग्रेस आणि जवाहरलाल नेहरुंची देणगी असल्याचे काँग्रेसचे नेते असतात. पण हाच तुमचा इतिहासाचा अभ्यास आहे का? असे म्हणत त्यांनी काँग्रेसला चांगलेच फटकारले. तसेच लोकशाही हा देशाच्या संस्कृतीचा एक भागच असल्याचे त्यांनी सांगितले. राष्ट्रपतींचे अभिभाषण हे कोणत्या एका पक्षाचे नसते. ते सर्वांचे असते. काँग्रेसला वास्तवाची जाणीव असती तर त्यांची ही अवस्था झाली नसती.