‘कोरोना’- मुक्तीची गुढी उभारूया…! मोदी-शाहांनी मराठीत दिल्या गुढीपाडव्याच्या शुभेच्छा

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिंदू नवर्ष गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मराठीजनांच्या नववर्षाची सुरुवात गुढीपाडव्याने होते. तुम्हाला आनंद, समृद्धी यासोबतच चांगले आरोग्य लाभो असे मोदींनी त्यांच्या शुभेच्छा संदेशात म्हटले आहे.

तसेच ‘कोरोना- मुक्तीची गुढी उभारूया…नवीन वर्ष २१ दिवस घरी थांबून साजरे करूया…तुम्हां सर्वांना गुढी पाडवा आणि नव वर्षाच्या शुभेच्छा…आपणांस व आपल्या परिवारास हे नवीन वर्ष आनंदाचे, भरभराटीचे आणि उत्तम आरोग्याचे जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना…,’ असं ट्विट करत गृहमंत्री अमित शाह यांनीही मराठी भाषेत ट्वीट करत गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या.

याच प्रमाणे, ‘राज्यातील जनतेला गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देताना, यंदाचा गुढीपाडवा घरात थांबूनच साजरा करावा. रस्त्यावर उतरु नका, गर्दी टाळा! ‘कोरोना’विरोधात जनजागृती करण्याची, ‘कोरोना’ला हरवण्याच्या संकल्पाची गुढी उभारा,’ असं ट्वीट राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे.

दरम्यान, ‘नागरिकांच्या सोयीसाठी दवाखाने, हॉस्पिटल, वैद्यकीय सेवा आणि अत्यंत निकडीच्यावेळी वाहतूक सेवाही उपलब्ध करून दिली जाईल. कृपया, मुख्यमंत्री महोदयांनी राज्यात लागू केलेल्या संचारबंदीचं पालन जनतेनं करावं. त्यांनी केलेल्या आवाहनाला मोठा प्रतिसाद द्यावा, अशी कळकळीची विनंती देखील अजित पवारांनी जनतेला केलं आहे.