विराट कोहलीचं ‘ते’ चॅलेंज मोदींनी स्वीकारलं

narendra modi narendra modi likely-to-go-for-cabinet-expansion

नवी दिल्ली : केंद्रीय क्रीडा मंत्री राज्यवर्धन सिंह राठोड यांनी फिटनेसबाबत जागरुकता वाढावी यासाठी व्यायाम करत असतानाचा आपला एक व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड केला होता. हा व्हिडीओ अपलोड करताना त्यांनी क्रीडा आणि चित्रपट क्षेत्रातील काही प्रमुख व्यक्तींना टॅग करुन त्यांनाही या अभियानात सहभागी होण्याचं आवाहन केलं होतं. यामध्ये विराट कोहलीचाही समावेश होता.

भारतीय क्रिकेट कर्णधार विराट कोहलीने केंद्रीय क्रीडा मंत्री राज्यवर्धन सिंह राठोड यांनी दिलेलं ‘फिटनेस चॅलेंज’ स्वीकारलं आहे. हे चॅलेंज स्वीकारतानाच कोहलीने पंतप्रधान नरेंद मोदी, माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी आणि अनुष्का शर्मा यांना टॅग करुन आव्हान दिलं आहे.त्यांचं हे चॅलेंज कोहलीने पूर्ण करुन आपला व्यायाम करतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. यासोबतच त्याने, ‘मी राज्यवर्धन राठोड सरांचं फिटनेस चॅलेंज स्वीकारलं आहे, आणि आता मी माझी पत्नी अनुष्का शर्मा, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महेंद्रसिंग धोनी यांना चॅलेंज करतोय’, असं ट्वीट त्याने केलं.

दरम्यान आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विराट कोहलीचं हे चॅलेंज’ स्वीकारलं आहे. त्यांनी विराटला ट्विटरमधून उत्तर दिलं. #HumFitTohIndiaFit हा हॅशटॅग वापर ‘विराट मी चॅलेंज स्वीकारलं, मी लवकरचं माझाही व्हिडिओ शेअर करेन’ असं मोदी म्हणाले आहेत. दरम्यान योग दिवसाचा प्रचार करण्यासाठी त्यांनी एक अॅनिमेटेड व्हिडिओही शेअर केला आहे. राजवर्धन सिंह यांनी सुरु केलेल्या या फिटनेस चॅलेंजला जोरदार प्रतिसाद मिळताना दिसून येत आहे.