नरेंद्र दाभोलकर खून प्रकरण : तब्बल आठ वर्षांनंतर पाच जणांवर आरोप निश्चित

नरेंद्र दाभोलकर

मुंबई – डॉक्टर नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातील पाच आरोपींविरुद्ध दोषारोप निश्चित करण्यास सुरुवात. या प्रकरणात पाच आरोपींविरुद्ध दोषारोप निश्चित करण्यास न्यायालयाने परवानगी दिलीय. विरेंद्र तावडे – कटाचा सूत्रधार, सचिन अंदुरे- मारेकरी, शरद कळसकर- मारेकरी, विक्रम भावे, या चार आरोपींविरुद्ध युएपीए कायद्यानुसार कारवाई करण्याची शिफारस सीबीआयने न्यायालयाकडे केली.

या आरोपींविरुद्ध हत्या, हत्येचा कट रचने आणि दहशत माजवणे असे आरोप आहेत. तर या प्रकरणातील पाचवा आरोपी सनातन संस्थेचा वकील संजीव पुनाळेकर यांच्या विरोधात हत्येसाठी वापरलेली शस्त्र नष्ट करण्याच्या गुन्ह्यासाठी दोषारोप निश्चित करण्याचे आदेश न्यायालयाने दिलेत.

दाभोलकर हत्या प्रकरणात बुधवारी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे ही सुनावणी झाली. यामध्ये विरेंद्रसिंह तावडे येरवडा कारागृहातून, शरद कळसकर आर्थररोड कारागृहातून, सचिन अंदुरे औरंगाबाद कारागृहातून उपस्थित होते. तर याप्रकरणात जामीन मिळालेले ऍड. संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे न्यायालयात उपस्थित होते. सर्वांना आरोप कबूल आहे का, अशी विचारणा न्यायाधीशांनी केली. त्यावर आरोपींनी गुन्हा कबूल नसल्याचे न्यायालयाला सांगितले.

सुनावणी दरम्यान आरोपींनी गुन्हा निश्चित करण्यास वेळ मागितला. परंतु न्यायालयाने आरोप निश्चिती करण्यास मुदतवाढ देता येणार नसल्याचे स्पष्ट करून गुन्हा कबूल नसल्याबाबत आरोपींचा जबाब नोंदवला. या प्रकरणात संजीव पुनाळेकर यांच्यावर पुरावे नष्ट केल्याप्रकरणी तर इतरांवर खून तसेच यूएपीएच्या कायद्यानुसार आरोप निश्चित करण्यात आले. या केसबाबत सरकारी पक्षातर्फे आवश्यक कागदपत्रे, पुरावे सादर केल्यानंतर प्रत्यक्ष या केसची सुनावणी होणार असून, पुढील सुनावणी 30 सप्टेंबर रोजी होईल.

महत्त्वाच्या बातम्या