नरेंद्र मोदींच्या हस्ते भारत- नेपाळ बस सेवेचे उद्धाटन

काठमांडू – आजपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दोन दिवसीय नेपाळ दौऱ्याला सुरुवात झाली आहे. नेपााळमध्ये दाखल झाल्यानंतर मोदींनी भारत-नेपाळ बस सेवेचे उद्धाटन केले. या बस सेवेचा मार्ग नेपाळमधले जनकपूर हे सीतेचे जन्मगाव ते उत्तर प्रदेशातील अयोध्या असा असणार आहे.

या मार्गावर बससेवेचे उद्धाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी व नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांच्या उपस्थितीत झाले. रामायण सर्किट या नावानं ओळखल्या जाणाऱ्या स्थळांना जोडणारी धार्मिक पर्यटन अशी ही कल्पना असून तिचं उद्घाटन मोदींनी केलं आहे. अयोध्या, नंदीग्राम, श्रींगवेरपूर आणि चित्रकूटसारख्या 15 ऐतिहासिक स्थळांचा समावेश या रामायण सर्किटमध्ये असेल अशी माहिती यावेळी देण्यात आलीये.

दोन दिवसीय दौऱ्यात मोदी तीन तीर्थस्थळांना भेटी देणार आहेत. मोदी त्यांच्या दौऱ्यात एका प्रकल्पाचे भूमिपूजनही करणार असून दोन्ही देशांमध्ये महत्वाचे करारही होतील. नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांच्या निमंत्रणावरुन मोदी नेपाळला गेले आहेत. नेपाळमध्ये नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर भारताकडून प्रथमच हा उच्च स्तरीय दौरा होत आहे.