‘अॅट्राॅसिटी’ खटल्यात नारायण राणेंना तात्पुरता दिलासा

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे तत्कालीन आमदार पद्माकर वळवी यांना 17 वर्षांपूर्वी डांबून ठेवल्याप्रकरणी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्याविरोधात कनिष्ठ न्यायालयात सुरू असलेल्या अॅट्रॉसिटी खटल्याला उच्च न्यायालयाने तात्पुरती स्थगिती दिली आहे.उच्च न्यायालयात याचिका प्रलंबित असेपर्यंत सत्र न्यायालयाने खटला चालवू नये, असे मंगळवारी निर्देश देत न्यायालयाने नारायण राणे यांना अंतरिम दिलासा दिला.

२००२ मध्ये काँग्रेसचे सरकार पाडण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे तत्कालीन आमदार पद्माकर वळवी यांचे अपहरण केल्याचा गुन्हा नारायण राणे, बाळा नांदगावकर व भाजपाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्यावर नोंदविला. हा गुन्हा रद्द करण्यासाठी तिघांनीही सत्र न्यायालयात अर्ज केला. मात्र, सत्र न्यायालयाने त्यांचा अर्ज फेटाळला. सत्र न्यायालयाच्या या निर्णयाला नारायण राणे यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले. या याचिकेवरील सुनावणी न्या. अमजद सय्यद व न्या. मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठापुढे होती.

मंगळवारच्या सुनावणीत न्यायालयाने राणे यांची याचिका दाखल करून घेतली. ती उच्च न्यायालयात प्रलंबित असेपर्यंत सत्र न्यायालयाने खटला चालवू नये, असे निर्देशही खंडपीठाने सत्र न्यायालयाला दिले. त्यामुळे राणे यांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे.