नारायण राणे यांची साथ देणार – आ.कोळंबकर

narayan rane

मुंबई : नारायण राणे माझे जुने मित्र आहेत. कॉंग्रेसमध्ये मला जी ताकद मिळणे अपेक्षित होती, तशी मिळाली नाही, अशी खंत व्यक्त करत राणे जिथे जातील तिथे त्यांच्याबरोबरच जाणार, असे कॉंग्रेसचे आ. कालिदास कोळंबकर यांनी आज येथे सांगितले . आ. कोळंबकर यांच्या वक्तव्यानंतर ते राणे यांच्या सोबत भारतीय जनता पक्षाच्या वाटेवर असल्याचे स्पष्ट झाले आहे . २००५ मध्ये राणे यांनी शिवसेना सोडून काँग्रेस मध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला होता . त्यावेळीही कोळंबकर हे शिवसेनेतून बाहेर पडले होते . ज्यांना जनाधार आहे अशांना काँग्रेसमध्ये महत्व मिळत नाही . आम्ही विरोधी पक्षात असलो तरी जनतेला आमच्याकडून अपेक्षा आहेत. त्यांची कामे झाली पाहिजेत. कॉंग्रेसमध्ये कामे केली जात नाहीत. बीडीडी चाळींचा विकास झाला पाहिजे, गिरणी कामगार व पोलिसांना घरे मिळाली पाहिजेत. आणखी किती वर्षे वाट पाहायची, असा प्रश्न आ. कोळंबकर यांनी विचारला. माझ्या मतदार संघातील अनेक कामे मुख्यमंत्री फडणवीस यांनी मार्गी लावली . या बद्दल फडणवीस यांची प्रशंसा केली तर काय चुकले , असा सवालही त्यांनी केला . जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी काहीतरी करावे लागेल. लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही प्रयत्न करत असतो. मी विरोधी पक्षात असूनही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीडीडी चाळींचा प्रश्न सोडवला. या बरोबरच गिरणी कामगारांच्या घरांचाही प्रश्न सोडवत आहेत. अशा वेळी मुख्यमंत्र्यांचे आभार मानणे हा गुन्हा आहे का. त्यांचे आभार मानणे माझे कर्तव्य आहे, असेही कोळंबकर म्हणाले.