राणेंचा महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष लोकसभेच्या रिंगणात , मुख्यमंत्र्यांसोबत चर्चेनंतर निर्णय

टीम महाराष्ट्र देशा : शिवसेना , कॉंग्रेस, भाजप असा प्रवास झाल्यानंतर नारायण राणे यांनी स्थापन केलेल्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाने आता लोकसभेच्या रिंगणात उतरण्यासाठी कंबर कसली आहे. काल रात्री नारायण राणे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात चर्चा झाल्यानंतर राज्यात पाच ठिकाणी राणेंचा महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष लोकसभेच्या जागा लढवणार असल्याचा निर्णय झाल्याची बातमी समोर येत आहे. मात्र या पाच जागा कोणत्या हे समोर आलेलं नाही. पण कोकणात राणेंच प्रस्त पाहता भाजप कोकणात राणेंना जागा सोडणार असल्याची माहिती विश्वसनीय सुत्रांकडून समजत आहे.

आधी शिवसेना,मग कॉंग्रेस,आणि आता भाजपच्या आश्रयाने सुरु असलेला महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष आणि खासदार नारायण राणे यांचा प्रवास आता नव्या वळणावर येऊन पोहचला आहे. 2005 साली शिवसेनेला जय महाराष्ट्र करून बाहेर पडलेल्या नारायण राणे यांची वणवण सुरूच असल्याने राणे काँग्रेसमध्ये घरवापसी करणार असल्याच्या चर्चा पुन्हा एकदा सुरु झाल्या आहेत. मात्र रात्री झालेल्या बैठकीत राणे हे भाजपसोबतच राहणार असल्याचं स्पष्ट झाल आहे.

दरम्यान, खासदार नारायण राणे काँग्रेसमध्ये घरवापसी करणार आसल्याचे संकेत माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिले होते. नारायण राणेंचं मन भाजपात रमत नाही. त्यांना आजही चुकल्या चुकल्यासारखं वाटतं आहे. त्यामुळे राणे काँग्रेसमध्ये परतण्याची शक्यता वर्तवणारं सूचक विधान थोरात यांनी केलं होत.