पक्ष स्थापनेलाच नारायण राणेंचा बुलेट ट्रेनला पाठींबा, तर उद्धव ठाकरेंवर सडकून टीका

narayan rane new political party

वेबटीम: माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी आज आपल्या राजकारणाची नवीन दिशा जाहीर केली असून ‘महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची’ स्थापना केली आहे. राणे यांनी पक्ष स्थापनेच्या सुरुवातीलाच उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली, तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपची पाठराखण केली आहे. तसेच बुलेट ट्रेनला आपला पाठींबा दर्शवत ‘मुंबईच्या रेल्वेसाठी होणारा खर्च बुलेट ट्रेनसाठी वळवण्यात येत नाहीये. तर त्यासाठी वेगळं कर्ज घेतलं जातंय. त्यामुळे 50 वर्षे नंतर येणारी सेवा आज येणार असेल तर काय हरकत आहे, असं नारायण राणे म्हणाले आहेत.

दुसरीकडे पक्ष स्थापनेच्या सुरुवातीलाच उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका करत आपला राजकीय प्रतिस्पर्धी कोण असणार हे दाखवून दिल आहे. पंतप्रधाना सारख्या व्यक्तीवर उद्धव ठाकरे करत असलेली टीका अशोभनीय आहे. उद्धव ठाकरे एका पक्षाचे प्रमुख असून त्यांचं देशासाठी-राज्यसाठी योगदान काय याच आत्मपरीक्षण त्यांनी केलेल नसल्याची टीका राणे यांनी केली. तसेच देशात सगळ्यात जास्त मुंबई महापालिकेत भ्रष्टाचार असून, मुंबई महापालिकेत जे कर लावले जात आहेत त्यामुळे मुंबईत घर महाग झालं त्यावर उद्धव ठाकरे याबाबत बोलत नसल्याचही ते म्हणाले आहेत.

दरम्यान नारायण राणे यांनी नवीन पक्षाची घोषणा केली असली तरी त्यांचे पुत्र आमदार नितेश राणे हे मात्र अजूनही कॉंग्रेसमध्येच आहेत. तसेच राणे यांच्या सोबत कोण येणार असा प्रश्न विचारला असता ‘ आत्ताच दुकानाची सुरुवात केली आहे’ याच्यानंतर सोबत कोण येणार हे पहाव लागेल अस उत्तर त्यांनी दिल आहे.