शिवसेना ते भाजप व्हाया कॉंग्रेस : नारायण राणे

narayan rane bjp entry

दिपक पाठक : फक्त तांत्रिकदृष्ट्या काँग्रेसमध्ये असलेले नारायण राणे यांचा भाजप प्रवेश नेमका कधी होणार याबाबत महाराष्ट्रात उत्सुकता निर्माण झाली आहे. राणे समर्थकांनी आतापासूनच वातावरण निर्मिती सुरु केलीय. ‘आमचा पक्ष राणेसाहेब’ या घोषवाक्याच्या जाहिराती आता सोशल माध्यमांवर पसरवल्या जात आहेत..शिवसेनेचा वाघ ते भाजपमध्ये प्रवेश करून राजकारणाची नवी इनिंग सुरु करण्याच्या तयारीत असेलेले नारायण राणे यांचा आजपर्यंतचा प्रवास अतिशय रंजक राहिला आहे .

चेंबूर ते शिवसेना वाघ

narayan rane 1राजकारणामध्ये पदार्पणाआधी नारायण तातू राणे हे चेंबूरमधील ‘हऱ्या-नाऱ्या’ गँगमध्ये सक्रीय असल्याच बोलल जात. राणे आणि त्यांचा मित्र हनुमंत परब यांची चेंबूर परिसरात चांगलीच दहशत होती. मात्र राणे समर्थकांच्या दाव्यानुसार ते त्याकाळी प्राप्तीकर विभागात नोकरीस असल्याच बोलल जात. पुढे नारायण राणे यांना लीलाधर डाके यांनी शिवसेनेत आणलं. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे तसेच रामदास कदम यांनी कोंबडी चोर म्हणून अनेक वेळा राणेंवर टीका केली आहे. अस असल तरीही राणे यांच्या विरोधात असा कुठलाही चोरीचा गुन्हा कोणत्याच पोलीस स्टेशन मध्ये दाखल नाही.

शाखा प्रमुख ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री 

1968 साली वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी नारायण राणे यांचा शिवसेनेत प्रवेश झाला . प्रवेशा सोबतच त्यांच्यावर शिवसेनेच्या चेंबूर येथील शाखेच्या शाखाप्रमुखपदाची जबादारी सोपवण्यात आली आणि आणि अशाप्रकारे राणेंच्या रूपाने एका नवीन ताऱ्याचा राजकारणाच्या क्षितिजावर उदय झाला.1985 ते 1990 या काळात शिवसेनेचे नगरसेवक. त्यानंतर बेस्टचे अध्यक्षपद सांभाळनारे राणे पुढे 1990-95 पहिल्यांदा विधानसभेवर निवडून गेले .त्याकाळी शिवसेनेचे अतिशय वजनदार नेते म्हणून ओळख असलेले छगन भुजबळ यांनी 1991साली शिवसेना सोडल्यानंतर पक्षातील महत्त्व वाढले. याच काळात त्यांनी विधानपरिषदेचे विरोध पक्ष नेतेपद सांभाळले . 1996 साली युतीची सत्ता आल्यानंतर राज्याच्या महसूल मंत्रीपद सांभाळले .मनोहर जोशींच्या नंतर 1999 महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची माळ राणे यांच्या गळ्यात पडली . शिवसेनेत उद्धव ठाकरे यांच्यासोबत मतभेद झाल्यानंतर पक्षनेतृत्वावर टीका करत 3 जुलै 2005 रोजी शिवसेनेला राम राम ठोकला

कॉंग्रेस प्रवेश

narayan rane congress entryपुढे नारायण राणे यांनी कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचा मुख्यमंत्री करण्याचा शब्द घेवून कॉंग्रेसचा झेंडा हाती घेतला. मात्र कॉंग्रेसने बक्षीस म्हणून राणे यांना महसूल मंत्रीपद देऊ केलं मात्र मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या विरोधात केलेल्या बंडापासून त्यांच्या राजकीय कारकिर्दीला ग्रहण लागलं 2008 मध्ये पक्ष विरोधी टिप्पणीमुळे त्यांना कॉंग्रेस मधून निलंबन करण्यात आलं. कधीकाळी मुख्यमंत्री पद सांभाळणाऱ्या राणेंची उद्योग मंत्रीपद देऊन बोळवण करण्यात आली .पुन्हा एकदा मुख्यमंत्री होण्याच्या हव्यासामुळे राणे यांचे कॉंग्रेस नेत्यांसोबत खटके उडत गेले .

विधानसभा निवडणुकीत पराभव 

narayan rane looses banrda electionअंतर्गत राजकारण आणि कडव्या शिवसैनिकांच्या झुंजार प्रतिकारामुळे २०१४ विधानसभा निवडणुकीत कणकवली मतदारसंघातून शिवसेनेच्या वैभव नाईक यांच्याकडून राणेंचा दारूण पराभव झाला, यावेळी राणेंचे राजकारण संपले अशी टीका विरोधकांकडून करण्यात आली. हा पराभव पचवत असतानाच 2015 साली झालेल्या वांद्रे पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीतही राणेंना जोरदार धक्का बसला शिवसेनेच्या नवख्या तृप्ती सावंत यांनी त्यांचा पराभव केला. दुबळ्या कॉंग्रेस नेतृत्वामुळेच आपला पराभव झाला म्हणत नारायण राणे यांनी राज्यातील कॉंग्रेस नेतृत्वावर टीका केली. येथूनच राणे कॉंग्रेस सोडणारच्या चर्चा सुरु झाल्या

भाजप प्रवेशाच्या मार्गावरील राणे

narayan rane & devendra fadanvisराजकारणात अतिशय चाणाक्ष अशी ओळख असणारे राणे यांची पुन्हा एकदा मुख्यमंत्री होण्याची महत्वकांक्षा सर्वश्रुत आहे . याच कारणावरून त्यांनी वेळोवेळी कॉंग्रेस नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले . मात्र दुसरा कोणताही सक्षम पर्याय उपलब्ध नसल्याने घुसमट होत असताना देखील राणे कॉंग्रेस मध्ये राहिले . राष्ट्रवादी मध्ये मुख्यमंत्री होण्यासाठी गुढ्घ्याला बाशिंग बांधून बसलेले अजित दादा असल्याने तिकडे नो एन्ट्री होती तर दुसऱ्या बाजूला शिवसेनेने आपली दार राणेंसाठी कधीच बंद करून टाकली आहेत .

महाराष्ट्रातील सध्याच्या भाजप सरकार विरोधात नाराजी वाढत आहे.शेतकरी कर्जमाफी , धनगर आरक्षण, मराठा आरक्षण या मुद्द्यांना हाताळण्यात फडणवीस म्हणावे तितके यशस्वी झाले नाही. मुंबईमधील मराठा आरक्षणाच्या मोर्चामधील नितेश राणे यांची भूमिका त्यांनी घेतलेला पुढाकार याचा अन्वयार्थ राजकारणाच्या जाणकारांच्या आधीच लक्षात आला आहे . विरोधकांच्या आणि शिवसेनेच्या कात्रीत सापडलेल्या भाजपकडे सध्या आक्रमक नेत्याची गरज आहे. राणेंना भाजप मध्ये प्रवेश देऊन शिवसेनेला शह देता येईल तसेच कोकणामध्ये पक्ष वाढीसाठी फायदा होईल अशी अपेक्षा आहे.

सध्या गृहमंत्रीपद मुख्यमंत्र्यांकडे आहे ते सुद्धा राणेंना मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही . मात्र एवढ सगळ करून देखील मुख्यमंत्रीपदाची माळ राणेंच्या गळ्यात पडेल याची शक्यता धूसरच आहे . तर दुसऱ्याबाजूला राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी झगडत असणाऱ्या राणेंसाठी भाजप प्रवेश संजीवनी ठरू शकतो